“अहंकार रावण का भी नहीं बचा था..”; केजरीवाल यांच्या पराभवानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Delhi Election Results | दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत आपचा पराभव झाला आहे आणि दिल्लीत भाजपाचं कमळ २७ वर्षांनी फुलणार आहे यात आता काहीही शंका राहिलेली नाही. दरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. दरम्यान, यावरून राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया साइट ‘एक्स’ वर एक पोस्ट शेअर केली आहे.
स्वाती मालीवाल यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्यामध्ये द्रौपदीचे वस्त्रहरण करतानाचे चित्र आहे. याचबरोबर मालीवाल यांनी “अहंकार रावण का भी नहीं बचा था…” अशीही पोस्ट केली आहे. त्यामुळे स्वाती मालीवाल यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अपमानाची आठवण करून दिली अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : ‘आप’ला सर्वात मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या सचिवाने गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यांनी आरोप केला होता की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या ड्रॉईंग रूममध्ये वाट पाहत असताना, केजरीवाल यांचे सचिव विभव कुमार यांनी त्यांना मारहाण केली होती.