सत्तेची मस्ती नाही तर काय? गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळे आक्रमक

मुंबई | कल्याण डोंबिवली शहरातील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी या घटनेचा निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्याने कुणी गोळीबार केला त्यांना कडक शिक्षा व्हावी. या घटनेमागे काहीही कारण असले तरी गोळीबार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पोलिसांच्या समोरच जर गोळीबार होत असेल तर ही सत्तेची मस्ती नाहीतर काय आहे?
आपण कुठेही गोळी चालवू शकतो, असं त्यांना वाटत असेल तर हे गुंडाराज नाही तर काय? असा उद्विग्न सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्या आपापसातली जी काही भांडणे असतील ती त्यांनी सोडवावीत. यामध्ये महाराष्ट्रातील सामान्य माणूस भरडला जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा – भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर अंदाधुंद गोळीबार, कारण काय?
राज्याच्या गृहमंत्र्यांचे काहीही नियंत्रण उरले नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. मी ही बाब केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे. याबाबत आज ट्विट करणार आहेच. त्याशिवाय अधिवेशनादरम्यान अमित शाह भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
आम्ही बंदुकीच्या विरोधात आहोत. इथे तर चक्क गोळीबार केला जात आहे. बंदूक सीमेवर जवानांकडे आणि पोलिसांकडे असायला हवी. आपण पोलिसांचा मानसन्मान करतो. महाराष्ट्रात पोलिसांकडे एका वेगळ्या आदराने पाहिले जाते. या देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल कुठले असेल तर ते महाराष्ट्रातले आहे आणि महाराष्ट्राच्याच एका पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदार गोळीबार करत असेल तर ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. दिवसाढवळ्या, कॅमेऱ्यासमोर पोलीस ठाण्यात भांडणे होतात आणि पोलिसांसमोरच गोळीबार करण्याची आमदाराची हिंमतच कशी होते. गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घेऊन राजीनामा दिलाच पाहीजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.





