“शिव–शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा कधीही सोडणार नाही”; शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक

पुणे | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भावनिक भाषण करत शिव–शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचा वारसा कधीही सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. भाषणादरम्यान त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शिवजयंती हा केवळ उत्सव नाही तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. शिवजयंतीनिमित्ताने शिवनेरीवर हजर राहणे हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच भावनिक आहे. हा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. नुकतेच मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण, ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आई जिजाऊ उभ्या होत्या, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
हेही वाचा : उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केली निगडी प्राधिकरण अग्निशमन केंद्राच्या कामाची पाहणी
जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटांशी दोन हात करण्याची जिद्द दिली हीच आपली प्रेरणा असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजित पवारांनी ज्या विचारांवर वाटचाल केली तो शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराचा वारसा कधीही सोडणार नाही, असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. शिवजयंतीच्या निमित्ताने अजित पवार शिवनेरीवर कायम उपस्थित राहत होते, असेही पवार यांनी सांगितले. शिवनेरीबाबत अजित पवारांच्या आठवणी आणि दृष्टीकोन सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला.
अजित पवार यांनी शिवनेरी विकास आराखडा, रायगड विकास आराखडा, आग्रा आणि संगमेश्वर येथील स्मारकासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या.




