Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटीच्या ताफ्यात १०० ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ मिडी बस

मुंबई | प्रवाशांना आरामदायी प्रवास घडावा यासाठी बसचा ताफा अद्ययावत करण्यावर एसटी महामंडळाने भर दिला आहे. त्या दिशेने वाटचाल करताना महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबर महिन्याअखेर नवीन ८ हजार ३०० बस दाखल होणार आहेत. यात साध्या, स्मार्ट, व्होल्वो (आसनी आणि शयनयान), मिनी बस श्रेणीतील गाड्यांचा समावेश आहे. १०० मिडी बस पुण्यश्लोक अहिल्यादेवी नावाने राज्यातील दुर्गम भागात धावणार आहेत.

राज्याची जीवनवाहिनी म्हणूनच एसटी ओळखली जाते. दिवसाला सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत गाड्यांची संख्या अपुरी आहे. एसटीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवासी वाहतुकीच्या अन्य पर्यायाकडे वळतात. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. प्रवासी संख्येसह उत्पन्न वाढीसाठी एसटीने सेवा विस्तारण्यावर भर दिला आहे. ग्रामीण भाग, महानगरे, पर्यटनस्थळांवर लक्ष केंद्रीत करून विविध प्रकारच्या गाड्या खरेदी करण्यात येत आहेत.

ग्रामीण भागासाठी तीन हजार साध्या बस

ग्रामीण आणि तालुकास्तरासाठी तीन हजार साध्या गाड्या तीन बाय दोन असल्याने आसनक्षमतेत वाढ होणार आहे. मार्च महिन्यापासून या गाड्या टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत. या गाड्या राजमाता जिजाऊ नावाने शटल सेवा म्हणून धावणार आहेत.

हेही वाचा     :              “शिव–शाहू–फुले–आंबेडकरांचा वारसा कधीही सोडणार नाही”; शिवनेरीवर सुनेत्रा पवार भावूक

तालुक्यांना जोडणार स्मार्ट बस

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथून जिल्हे आणि तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गांवर स्मार्ट बस चालवण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. यासाठी पाच हजार गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानावर (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स- एआय) आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यान्वित असेल. सुरक्षिततेसाठी सीसी टीव्ही कॅमेरे आणि चालकांना झोप येत असल्यास अलार्म यंत्रणेची सुविधा असणार आहे.

खासगी ट्रव्हल्सला व्होल्वोची टक्कर

मुंबई, पुणे, गोवा, कोकण, नाशिक – पुणे अशा मार्गावरील पर्यटक आणि प्रवाशांसाठी व्होल्वो श्रेणीतील ३० शयनयान आणि १५० आसनी गाड्या येणार आहे. प्रायोगिक तत्तावर ३० शयनयान गाड्या सध्याच्या सर्वाधिक भारमान असलेल्या शयनयान मार्गावर धावणार आहेत. गाड्यांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

गाव तेथे एसटी – मिडी बस

गावखेड्यांतील अरुंद रस्ते, आदिवासी दुर्गम भाग, त्याचबरोबर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी १०० मिडी बसचा समावेश एसटी ताफ्यात करण्यात येणार आहे. या गाड्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे नाव देण्यात येणार आहे.

प्रवाशांकरिता जादा बसची आवश्यकता आहे. मार्च महिन्यापासून प्रवासी सेवेत नवीन बस दाखल होतील. ताफ्यातील १३०० बस भंगारात काढण्यात येणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. या बसच्या जागी नवीन बस येतील.

– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button