मेट्रोतून खाली उतरलं की रिक्षा तयार!
पुण्यातील 'नळ स्टॉप' मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा

पुणे | प्रतिनिधी : पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी आता ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची समस्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे मेट्रो प्रशासन आणि रिक्षा संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून एसएनडीटी-नळ स्टॉप मेट्रो स्थानकापासून फीडर रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास केल्यानंतर घरी किंवा परिसरातील इतर ठिकाणी पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोपे होणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. “सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे ही सरकारची प्राथमिकता असून मेट्रोसह इतर वाहतूक व्यवस्थांनाही जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच भविष्यात इतर मेट्रो स्टेशनवरही अशा फीडर सेवांचा विस्तार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा : नवीन टॅरिफ रचना लागू होईपर्यंत भारत-अमेरिका व्यापार कराराला ब्रेक; वाणिज्य सचिवांचा खुलासा
दरम्यान, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो आणि रिक्षा यांचे समन्वयित जाळे तयार होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
वाहतुकीत अडथळा निर्माण न होण्याची अपेक्षा
अनेक नियमित मेट्रो प्रवाशांनी या सेवेचे स्वागत केले आहे. मात्र, मेट्रो स्टेशन परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र जागा व व्यवस्थित व्यवस्थापन असावे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली आहे. या सेवेच्या पहिल्या टप्प्यात कोथरूड मधील चार वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. अधिकारीही या सेवेमध्ये पुढील काही दिवसांत सुधारणा करण्याची तयारी दर्शवत आहेत.
भाडेदर किती?
या सेवेच्या पहिल्या टप्प्यात कोथरूड परिसरातील विविध भागांना जोडणारे चार वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये वारजे, डीपी रोड–राजाराम ब्रिज तसेच कर्वेनगर परिसरातील काही भागांचा समावेश आहे. अंतरानुसार प्रवाशांना प्रति सीट 20 ते 30 रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रिक्षा बुक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अॅपवरून रूट, थांबे आणि उपलब्ध रिक्षांची माहिती मिळते. राईड बुक केल्यानंतर एक कोड तयार होतो, तो चालकाला दाखवून प्रवासी प्रवास करू शकतात.
पुणे शहराचा झपाट्याने वाढत असलेला विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करणे ही आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. शहरातील दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासाठी मेट्रोसारख्या आधुनिक वाहतूक व्यवस्थेला रिक्षा सेवेसारख्या स्थानिक वाहतुकीची प्रभावी जोड मिळणे आवश्यक आहे. मेट्रो आणि रिक्षा यांचे समन्वयित जाळे उभे राहिल्यास ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक मजबूत होईल.
– मंजूषा नागपुरे, महापौर, पुणे महापालिका





