GDG on Campus MIT ACSC तर्फे ‘AI & ML Simplified’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
शिक्षण विश्व : विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याकडे नेणारा ज्ञानप्रवास

पुणे : GDG on Campus MIT ACSC यांच्या वतीने “AI & ML Simplified: Learn, Build, Innovate” या विषयावर शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी Classroom २०२ येथे एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) व मशीन लर्निंग (Machine Learning – ML) या आधुनिक व उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना सोप्या व समजण्याजोग्या पद्धतीने समजावून देणे हा होता. तसेच या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनातील उपयोग, उद्योगक्षेत्रातील करिअर संधी आणि नवोपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हेही कार्यशाळेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
कार्यशाळेसाठी विविध विभागांतील एकूण १६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८० विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त असून सत्रादरम्यान त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
हेही वाचा – निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पाच पोलिसांचे निलंबन

एड्युनेट फाउंडेशन, पुणे येथील कॉर्पोरेट ट्रेनर श्री. सार्थक नार्नोर यांनी Resource Person म्हणून कार्यशाळेला मार्गदर्शन केले. त्यांनी AI व ML मधील क्लिष्ट संकल्पना अत्यंत सोप्या, प्रभावी व उदाहरणांसह स्पष्ट केल्या. उद्योगातील त्यांच्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करिअर संधी, भविष्यातील ट्रेंड्स तसेच या तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व समजण्यास मोलाची मदत झाली.
ही कार्यशाळा डॉ. हर्षा पाटील व प्रा. अश्विनी सातकर यांच्या समन्वयाने यशस्वीरीत्या पार पडली. त्यांना डॉ. सुप्रिया लोंढे, डॉ. माधुरी दरेकर, श्री. सम्मेद बुकशेटे व प्रा. मनीषा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा उपक्रम माननीय संचालक डॉ. बी. बी. वाफारे तसेच डॉ. सुनील महाजन, अधिष्ठाता (Student Affairs) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
एकूणच, ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व उद्योगाभिमुख ठरली. GDG on Campus MIT ACSC भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण व तंत्रज्ञानाधारित उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आजच्या डिजिटल युगात AI आणि Machine Learning ही केवळ तंत्रज्ञानाची साधने नसून भविष्यातील करिअरची दिशा ठरवणारी शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी या संकल्पना केवळ शिकून न थांबता त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करून नवोपक्रमाकडे वाटचाल करावी.
– सार्थक नार्नोर.




