Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेखलोकसंवाद - संपादकीय

विशेष लेख: हिंदू म्हणून जगण्याची किंमत त्यांना पुन्हा एकदा मोजावी लागणार का?

राजकीय विश्लेषक सारंग कामतेकर

भारताच्या इतिहासात १९४७-४८ हे वर्ष एक कधीही न मिटणारी जखम कोरून गेले. पिंपरीमध्ये स्थायिक झालेल्या सिंधी आणि पंजाबी समुदायांसाठी तर ते वर्ष म्हणजे त्यांच्या जीवनातील सर्वात रक्तरंजित आणि दुःखद काळ होता. हिंदू धर्माचेच आचरण करण्याच्या त्यांच्या दृढ निश्चयामुळे, त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित होण्याचा एक अत्यंत वेदनादायी प्रवास सुरू केला. हसण्या-खेळण्याने भरलेली आपली घरे, शेतीवाडी, पिढ्यानपिढ्या जपलेल्या व कमावलेल्या मौल्यवान वस्तू अगदी त्यांचे सर्वस्व मागे सोडून केवळ हिंदू म्हणून जगण्यासाठी ते भारतात आले.

– सारंग अविनाश कामतेकर, लेखक राजकीय विश्लेषक आहेत.

नसानसात भिनलेले हिंदुत्व आणि आपल्या हक्काच्या देशात जगण्याची आशा याशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हते. फाळणी झाल्यावर भारत आणि पाकिस्तानात दंगली उसळल्या होत्या. अशा स्थितीत हिंदू म्हणून जगण्याच्या जिद्दीने सिंधी-पंजाबी समुदायाने आपल्या मुलाबाळांसहित अक्षरशः: अंगावरच्या कपड्यांवरच भारतात येणाचा प्रवास सुरु केला. या प्रवासात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांची आपल्या प्रियजनांपासून ताटातूट झाली. काही जणांनी सोबत काही दागदागिने घेण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यात सुरु असलेल्या दंगलींमध्ये अत्यंत क्रूरपणे ते देखील हिसकावले गेले. फाळणीमध्ये या समुदायाने केवळ आपली मालमत्ताच गमावली नाही, तर त्यांच्या मनावर आणि आत्म्यावर एक कधीही न भरणारी जखम झाली. त्यांनी अनुभवलेले आघात आणि त्यातून सावरण्यासाठी केलेला संघर्ष हा हिंदू म्हणून जगण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्याच्या जिद्दीचा पुरावा आहे. आपल्यामध्ये सहजपणे वावरणारा पिंपरीचा सिंधी आणि पंजाबी समुदाय हा त्या फाळणीच्या इतिहासाचा एक जिवंत अध्याय आहे, जो आपल्याला त्या काळच्या वेदनांची आणि मानवी धैर्याची आठवण करून देतो.

निर्वासितांच्या छावण्या
भारत सरकारने या विस्थापित झालेल्या लोकांना देशभरातील विविध निर्वासित छावण्यांमध्ये पाठविले. संपूर्ण आयुष्य सुखात घालवलेल्या सिंधी-पंजाबी समाजाला अचानकपणे विस्कळीत झालेल्या त्यांच्या जीवनाची नवी सुरुवात निर्वासित छावण्यांमधील खडतर परिस्थितीत करावी लागली. परंतु, या लढवय्या समुदायाची हिंदू म्हणून जगण्याची जिद्द यत्किंचितही कमी झाली नाही. पडेल ते काम करण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांनी त्या झोपडी वजा छावण्यांमध्ये अनेक दशके कठोर परिश्रम केले. अत्यंत धीराने, एकामागून एक संकटांचा समाना करत, त्यांनी आपले नवीन जीवन यशस्वीपणे विणले.

भारतीय भूमीवर जन्मलेल्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धैर्याचे गुण हे त्यांना वारशाने मिळाले आहेत. विस्थापनाच्या तीव्र वेदना सहन करत तसेच पुढच्या पिढ्यांनीही आपल्या पूर्वजांचा वारसा अभिमानाने पुढे नेला. हिंदू म्हणून जगण्याच्या एकमेव आणि पवित्र उद्देशासाठी त्यांनी सहन केलेल्या अतोनात हाल-अपेष्टा, आर्थिक व मानसिक नुकसान व फाळणीमुळे झेलाव्या लागलेल्या आघातांबद्दल त्यांनी कधी तक्रार केली नाही अथवा त्याचे भांडवल केले नाही. हिंदू म्हणून जगण्याचा वारसा त्यांनी अविरतपणे व अभिमानाने जपला.

माझी आई देखील त्यांच्यापैकी एक आहे
माझी आई देखील त्यांच्यापैकी एक आहे, वयाच्या अवघ्या सहा वर्षांची असताना , माझ्या आजी आजोबांसोबत आणि इतर नातेवाईकांसोबत ती त्यावेळेच्या अखंड भारतातील व आजच्या पाकिस्तानातील बन्नू कोहाट या भागातून हिंदू म्हणून जगण्याच्या जिद्दीने एका कठोर परिस्थितीतून निघाली. बन्नू कोहाट ते भारताच्या प्रवासात दंगलीतुन वाट काढत ते कसेबसे भारतात पोहोचले. रेल्वे मध्ये प्रवास करताना माझ्या आजोबांना मार लागला. माझ्या लहानपणी माझ्या आई आणि आजीने त्यांच्या कथा ऐकून भारावून गेलो होतो. आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवण्यासाठी एका संपूर्ण पिढीने केलेल्या अविश्वसनीय संघर्षाच्या त्या चालत्या बोलत्या कथा होत्या. मला माझ्या आजी-आजोबांचा, माझ्या आईचा आणि माझ्या मामांचा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या प्रामाणिकपणाने आणि अथक परिश्रमामुळे त्यांनी केवळ स्वतःचे जीवनच नव्हे, तर आमच्या पिढीसाठी आंनदी आणि आदराणे जगण्याचा मार्ग तयार केला. त्यांच्या कष्ट आणि बलिदाननाच्या मजबूत पायावरच आमचे वर्तमान उभे आहे.

कठोर परिश्रमातून समृद्धी
आज, संपूर्ण भारतामध्ये सिंधी आणि पंजाबी समुदाय हा निर्वासितांच्या छावण्यांच्या माध्यमातून पसरला आहे. आपली संस्कृती जप्त त्या त्या प्रांतातली भाषा संस्कृती त्यांनी आत्मसात केली आहे. उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्यासाठी हा समुदाय आज ओळखला जातो. पिंपरी- चिंचवड शहरातील या समुदायाची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. फाळणीनंतर, निर्वासित म्हणून त्यांना पिंपरी मध्ये १०-१५ फूट बाय ४०-५० फुटांच्या जमिनीचे छोटे तुकडे देण्यात आले होते. १९४८-५० च्या काळात पिंपरीच्या छोट्या गावाशेजारी असलेल्या सरकारी मालकीच्या क्षेत्रात हि छावणी तयार झाली. माझी आई, आजी आणि आजोबा यांना देखील याच छावणीमध्ये जागा मिळाली होती.
या निर्जन भूभागावर साधे तंबू उभारत या सिंधी-पंजाबी समुदायाने आपल्या नव्या जीवनाचा श्रीगणेशा केला. प्रतिकूल परिस्थिती असूनही, त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले स्वतःचे विश्व् घडवले. निर्वासित छावणीत कशीबशी राहण्यापुरती जागा मिळाली परंतु शेतीसाठी जमीन नसल्याने आणि नोकरी करण्याची मानसिकता या सिंधी-पंजाबी समुदायामध्ये नसल्याने त्यांनी छावण्यांमध्ये उभारलेल्या तंबूंमधूनच व्यापार करायला सुरुवात केली. सिंधी आणि पंजाबी समुदायाने अक्षरशः रक्त आणि घामाचे पाणी करून आपले व्यवसाय उभे केले आणि एक समृद्ध वसाहत निर्माण केली. त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर परिसराच्या आर्थिक विकासासाठीही मोठे योगदान दिले.

‘सनद’ मिळण्याची वाट पाहत आहे
भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे उलटून गेली आहेत,मात्र अत्यंत खेदाने हे नमूद करावे लागत आहे. ज्या सिंधी आणि पंजाबी समुदायाने आपले घरदार सोडून या भूमीला आपले जीवन समर्पित केले आहे, ते आजही या जमिनीच्या औपचारिक ‘सनद’ – म्हणजेच कायदेशीर मालकी हक्काची प्रतीक्षा करत आहेत. हा प्रदीर्घ, संतापजनक व अनाकलनीय विलंब त्यांच्या हिंदू म्हणून जगण्याच्या भावानेशी प्रतारणा करणारा आहे. ही केवळ एका जमिनीच्या तुकड्याच्या मालकीची बाब नसून, त्यांची अस्मिता आणि भावनेशी जोडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

पुन्हा विस्थापित होण्याचे संकट
पिंपरी-चिंचवडसाठी सुधारित विकास आराखडा दिनांक १५ मे २०२५ रोजी जाहीर झाल्यानंतर, पिंपरी कॅम्प परिसरातील रहिवाशांमध्ये पुन्हा विस्थापित होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या आराखड्यामध्ये पिंपरी कॅम्पमधील विविध १०-१२ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. काही ठिकाणी अस्तित्वातील रस्ते ९ मी., १२ मी. १८ मी. पर्यंत रुंद करण्यात येणार आहेत. तर काही ठिकाणी नव्याने रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. विकास आराखड्यातील या रस्त्यांमुळे येथील रहिवासी आणि व्यावसायिकांच्या मिळकती बाधित होत असून ररस्ता रुंदीकरणासाठी त्यांच्या घरावर अथवा दुकानांवर बुलडोझर चालवावा लागणार आहे.

“कँजस्टीड एरिया” च्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा
पिंपरी कॅम्प हा मूळतः निर्वासितांच्या छावणीचा १०-१२ फूट रुंद आणि ४०-५० फूट लांब असलेल्या जमिनींवर दाट लोकवस्तीने विकसित झालेला परिसर आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या भागाला “कँजस्टीड एरिया” म्हणजेच पिंपरी कॅम्पला ‘गर्दी’ ‘गावठाण’ क्षेत्र म्हणून अधिकृतपणे घोषित करण्याची मागणी दीर्घ काळापासून केली जात आहे. महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा त्याबाबत ठराव करण्यात आले होते. असे केल्यास, या परिसराच्या ऐतिहासिक आणि सामाजिक संरचनेचे जतन होण्यास मदत होईल. मात्र, या महत्त्वाच्या मागणीला प्रारूप सुधारित विकास आराखड्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत.
भोसरी, आकुर्डी आणि चिंचवड यांसारख्या इतर ‘गावठाण’ क्षेत्रांना “कंजस्टीड एरिया” मजणंजेच “गावठाण” चा दर्जा असल्याने त्याठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होत असताना त्याठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे कोणतेही प्रस्ताव नाहीत. त्यामुळे, ‘पिंपरी कॅम्प खूप गर्दीचा आहे’ हा युक्तिवाद येथे अन्यायकारकपणे लागू केला जात असल्याचा आरोप येथील रहिवासी व व्यापारी करत आहेत.

प्रस्तावित रस्ता रुंदीकरण
प्रस्तावित रस्ता रुंदीकरण हा केवळ वाहतूक कोंडी सोडवण्याचा उपाय नाही, तर तो या परिसरातील अनेक वर्षांपासून कष्ट करून उभे राहिलेल्या व्यवसायांसाठी थेट धोका आहे. ही दुकाने, हे व्यवसाय, यावरच अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहेत. या समुदायाने यापूर्वी विस्थापनाच्या झळा सोसल्या आहेत. ४-५ दशकांच्या मेहनतीने आणि अक्षरशः शून्यातून या नागरिकांनी आपले जीवन उभे केले आहे. मात्र महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्यामुळे आता हे सर्व पुन्हा विध्वंसाच्या सावटाखाली आले आहे. पुन्हा एकदा त्यांना हिंदू म्हणून जगण्याची किंमत मोजावी लागणार का ? हा विचारच हृदयद्रावक आहे.

दुहेरी मापदंड
पिंपरी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या नक्कीच आहे, यात काही शंका नाही. वाहतूक कोंडीमुळे होणारा विलंब आणि गैरसोय निश्चितच होते. मात्र, काही मिनिटांच्या वाहतूक कोंडीबद्दल तक्रारींवर उपाय शोधताना आपली तात्काळ प्रतिक्रिया संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त करण्याच्या मागणीपर्यंत का पोहोचते ? आपण त्या कष्टकरी समुदायाकडे दुर्लक्ष करत आहोत, ज्यांनी कोणतीही तक्रार न करता केवळ हिंदू म्हणून जगण्याच्या जिद्दीसाठी शून्यातून आपले जीवन आणि व्यवसाय उभे केले. पिंपरी बाजारपेठेला आज लाभलेले झगमगते स्वरूप हे त्यांनी त्यांच्या क्षताने मिळवून दिले आहे. पुणे शहरातील इतर बाजारपेठांमध्ये – जसे की तुळशीबाग, रविवारपेठ, अप्पा बळवंत चौक, लक्ष्मी रोड – अशीच वाहतूक कोंडीची समस्या आहे. तरीही, तिथे मात्र त्यांच्या स्थापित उपजीविकेला विस्थापित करणारे कोणतेही रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव राबविले जात नाहीत. कारण त्या क्षेत्रांना पण “कंजस्टेड एरिया” चा दर्जा प्राप्त आहे. मग, कष्टकरी सिंधी आणि पंजाबी समुदायासाठी ही वेगळी वागणूक का ? रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली त्यांच्या व्यवसायांवर आणि घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी करणे हे केवळ अव्यवहार्य नाही, तर नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे, पार्किंगची योग्य व्यवस्था करणे, वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी करणे आणि पर्यायी मार्गांचा विचार करणे यांसारख्या उपायांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

व्यापक व मानवीय दृष्टिकोन हवा
एखादा विकास आराखडा तयार करताना केवळ अभियांत्रिकी दृष्टिकोनातून तो तयार करणे चुकीचे. इमारती, रस्ते, पूल किंवा पायाभूत सुविधांची निर्मिती हे विकासाचे महत्त्वाचे पैलू असले तरी, ते संपूर्ण विकासाचे चित्र दर्शवत नाहीत. विकास हा केवळ दगड विटांच्या माध्यमातून होत नसतो तर शहराच्या विकासाची दिशा ठरवताना अभियांत्रिकी दृष्टिकोनासोबत अधिक व्यापक आणि मानवी दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. समायोपयोगी सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक नियोजन करताना तेथील स्थानिक व्यावसायिक आणि रहिवाशांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करणे महत्वाचे आहे. विकास आणि मानवी गरजा यांचा समतोल साधला तरच विविध समस्येवर शाश्वत उपाय मिळेल. मात्र दुर्दैवाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप सुधारित विकास योजनेत याचा विचार करण्यात आलेला नाही. हिंदू म्हणून जगण्याची खूप मोठी किंमत आपल्या सिंधी-पंजाबी बांधवांनी मोजलेली आहे. आता त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळावी यासाठी शहरातील हिंदू बांधवांनी एकत्र यावे हीच अपेक्षा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button