Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडा

मुंबईची क्वालिफायर-2 मध्ये धडक : गुजरात टायटन्सवर 20 धावांनी विजय

पंजाब किंग्सशी सामना : सामनावीर रोहित शर्माची 81 धावांची खेळी

चंदीगड : यंदाच्या आयपीएलमध्ये दणकेबाज सुरुवात करणाऱ्या गुजरात टायटन्सला एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह गुजरातचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. तर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने एलिमिनेटर सामन्यात गुजरातचा 20 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. आता क्वालिफायर-2 मध्ये त्यांची लढत पंजाबशी होईल.

रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावत 228 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली पण फलंदाजीत सातत्य न राखता आल्यामुळे त्यांना 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. 81 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गुजरात ची सुरूवात खराब

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खुपच खराब झाली आणि पहिल्याच षटकात कर्णधार शुभम गिल (1) ची विकेट पडली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर शुभम एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि कुशल मेंडिस यांनी 64 धावांची भागीदारी करत डावाची सूत्रे हाती घेतली. 20 धावा काढल्यानंतर मिशेल सँटेनरच्या चेंडूवर कुशल मेंडिस आऊट झाला. यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे गुजरात टायटन्स पुन्हा सामन्यात परतले. पण सुंदर-सुदर्शनची भागीदारी बुमराहने मोडली. वॉशिंग्टन सुंदरला 48 धावांवर बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर साई सुदर्शनने 49 चेंडूंमध्ये सर्वाधिक 80 धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे त्यांना 208 धावापर्यंतच मजल मारता आली.

प्रारंभी, मुंबईने नाणेफेक जिंकत न्यू चंदीगडच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिकचा हा निर्णय योग्य ठरला. सलामीवीर रोहित शर्मा व जॉनी बेअरस्टो या जोडीने मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 7.2 षटकांत 84 धावा जोडल्या. आयपीएलमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 22 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह 47 धावा केल्या. त्याला साई किशोरने बाद करत ही जोडी फोडली.

रोहित व सूर्यकुमार यादवने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेताना चौफेर फटकेबाजी केली. रोहित आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 34 बॉलमध्ये 59 रन्स केल्या. सूर्यकुमारने आपल्या आक्रमक शैलीत खेळताना 20 चेंडूत 1 चौकार व 3 षटकारासह 33 धावांचे योगदान दिले. पण, तोही फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर तिलकने रोहितला चांगली साथ दिली. तिलकने 11 चेंडूत 3 षटकारासह 25 धावा केल्या. रोहित आणि तिलकने तिसऱ्या विकेटसाठी 22 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, रोहित शर्माने मात्र शानदार फलंदाजी करताना 50 चेंडूत 9 चौकार व 4 षटकारासह 81 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहितने दोन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. खरं तर, हिटमन आता आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पाही ओलांडला. रोहित बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिकने फटकेबाजी करत संघाला 228 धावापर्यंत मजल मारुन दिली. हार्दिक 9 चेंडूत 22 धावांवर नाबाद राहिला.

मुंबई वि. गुजरात संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 5 बाद 228 (रोहित शर्मा 50 चेंडूत 81, जॉनी बेअरस्टो 22 चेंडूत 47, सूर्यकुमार यादव 33, तिलक वर्मा 25, हार्दिक पंड्या नाबाद 22, नमन धीर 9, प्रसिध कृष्णा व साई किशोर प्रत्येकी 2 बळी, मोहम्मद सिराज 1 बळी)

गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 बाद 208 (साई सुदर्शन 80, कुशल मेंडिस 20, वॉशिंग्टन सुंदर 48, रुदरफोर्ड 24, तेवतिया नाबाद 16, ट्रेंट बोल्ट 2 बळी, बुमराहृ, ग्लेसन, सँटेनर व अश्वनी कुमार प्रत्येकी 1 बळी).

रोहितचे षटकारांचे त्रिशतक

रोहित शर्माने या सामन्यात चार षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा भारताचा पहिला आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा फलंदाज बनला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्याने फक्त 142 आयपीएल सामन्यांमध्ये 357 षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

357 : ख्रिस गेल (141 डाव)

302 : रोहित शर्मा (266 डाव)

291 : विराट कोहली (258 डाव)

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button