Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नकोच: शरद पवार

दोन्ही राष्ट्रावादी काँग्रस एकत्र येण्याच्या चर्चेवर 'फुलस्टॉप'

पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात शरद पवारांचे संधीसाधूना खडे बोल

पिंपरी-चिंचवड: सत्तेसाठी भाजपसोबत जाणाऱ्यांची साथ नकोच, त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाहीच, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. संधीसाधूपणाचे राजकारण आपल्याला करायचे नाही, त्या दिशेने आपल्याला पावले टाकायची नाहीत असेही पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता दोन्ही राष्ट्रावादी काँग्रस एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ताथवडे येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शरद पवार बोलत होते. खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक राहुल कलाटे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, अरुण बोऱ्हाडे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवक प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रवक्ता माधव पाटील, काशिनाथ जगताप यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार यांनी पक्ष बदलणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खरमरीत टीका केली. शरद पवार म्हणाले सगळ्यांना बरोबर घेतले पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तर त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला करायचं नाही.

आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. असे सांगताना शरद पवार म्हणाले या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा    :      अहमदाबादवरून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाईट रद्द, प्रवासी संतापले 

महापालिका निवडणुकीची चिंता सोडा

तुम्ही निवडणुकीची काळजी करु नका. आपल्यासोबत जो येणार असेल, ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील. मी तुम्हाला विश्वास देतो. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला.

जुनी अनधिकृत बांधकाम टिकायला हवीत

रांजणगावला ही आम्ही औद्योगिक नगरी बनवलं. चाकण, बारामती, इंदापूर, अशा अनेक ठिकाणी औद्योगिक पट्टा निर्माण केला. पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला हे औद्योगिक आणण्यासासाठी आम्ही झटलो. आज स्थिती वेगळी आहे. आता इथलं राजकारण, समाजकारण बदललं आहे. इथलं नेतृत्व अण्णासाहेब मगर, मग आम्ही, त्यानंतर रामकृष्ण मोरे यांनी या शहराचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट घेतले. यामागे गांधी-नेहरूंचे विचार महत्वाचे ठरले. त्यांनी विकासाची गंगा आणली अन हीच विकासाची गाडी आपल्याला पुढं न्यायची आहे.

जी अनधिकृत बांधकाम आहेत, ती टिकायला हवीत. नव्यानं अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, पण जी पूर्वी झालीत ती टिकायला हवीत. रस्त्याच्या पलीकडे एक अन अलीकडे एक असा एक नवा व्यवसाय पिंपरी चिंचवडमध्ये सुरु झाला. हा व्यवसाय आपल्याला स्वच्छ करायचा आहे, असे शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी शहरातील नद्यांचे प्रदूषण आणि कुदळवाडीतील कारवाई यावर देखील भाष्य केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button