Satara News। राजधानी सातार्यात लवकरच होणार अत्याधुनिक सुविधांचे बसस्थानक!
ना. शिवेेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा : राज्य शासनाकडून 15 कोटींचा निधी उपलब्ध

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून प्रमुख बसस्थानक हे केवळ प्रवास केंद्र न राहता सातार्याच्या गौरवशाली इतिहासाला साजेसं आणि आधुनिकतेने परिपूर्ण असं महत्त्वाचं ‘लँडमार्क’ ठरणार आहे. सातार्याचे बसस्थानक एअरपोर्टसद़ृश तयार केले जाणार असून त्याची ऐतिहासिक शैलीने रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प फक्त बसस्थानकाचा विकास नसून तो सातार्याच्या शहरी व पर्यटन विकासाचा ‘आधारस्तंभ’ ठरणार आहे.
बसस्थानकाच्या मध्यभागी ‘दीपस्तंभ’
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या आग्रहाखातर या बसस्थानकास ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे. या बसस्थानकाची रचना खास सातार्याच्या ऐतिहासिक प्रेरणेतून घेण्यात आली आहे. बसस्थानकाच्या मध्यभागी ‘दीपस्तंभ’ उभारण्यात येणार आहे. या अनोख्या डिझाईनमुळे प्रवाशांना राजेशाही वातावरणाचा अनुभव येणार आहे. हे बसस्थानक फक्त सोयीसाठी नसेल, तर इतिहासाशी जोडणारा एक भावनिक दुवा ठरणार आहे. या बसस्थानक परिसरात लावण्यात येणार्या लाईट व त्यामध्ये सण, उत्सवानुसार बदलणारे लायटिंग असेल.
सातारा बसस्थानक विकास प्रकल्प…
सातारा बसस्थनक विकास प्रकल्पासाठी सुमारे 15कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासन खर्च करणार आहे. एमएसआरडीसीकडून लवकरच या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासामुळे स्थानिक व्यापारी, फेरीवाले, वाहतूकदार, टॅक्सी चालक, फूड स्टॉलचालक यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे. नव्याने बांधण्यात येणार्या बसस्थानकात व्यवसायिकांना 13 शॉप्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पर्यटन, व्यवसाय व शिक्षणासाठी येणार्या प्रवाशांची संख्या वाढणार असून त्याचा थेट लाभा सातार्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
हेही वाचा: विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या पूजेची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी, ‘अशी’ करा नोंदणी
सातारा बसस्थानक हे सातारा जिल्हावासीयांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. गेली अनेक वर्षे सातारकरांची इच्छा होती या बसस्थानकाचे रूपडे पालटावे. त्यामुळे अभ्यासकांशी चर्चा करून बसस्थानकाला वेगळे रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र, केवळ शोभनीयतेकडे न पाहता प्रवाशांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत याचाही प्रकल्पामध्ये अंतर्भाव केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हे बसस्थानक निश्चितपणे सोयीचे आणि आकर्षक ठरेल याची मला खात्री आहे.
– ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य