विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या पूजेची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी, ‘अशी’ करा नोंदणी

Pandharpur | श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात दि. २५ मार्च रोजी सकाळी ११ पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. ७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४ व दुसऱ्या टप्प्यात दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील श्रीच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा : नागपूर हिंसाचार प्रकरण : फहीम खानसह ५० जणांवर देशद्रोहाचा गुन्हा
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५०००, ११००० रुपये तसेच पाद्यपूजेसाठी ५००० व तुळशी अर्चन पूजेसाठी २१०० तसेच श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे २१००० रुपये, ९००० रुपये इतके देणगी मूल्य आहे.