Narendra Modi | ‘मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय’; संजय राऊतांचं विधान
आडवाणींना बेदखल करून मोदी पंतप्रधान झाले होते : संजय राऊत

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर संघ मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांशी बातचीत केली. या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातील असेल असं म्हटलं होतं. यानंतर आजही संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकारणातील निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की ७५ वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याचं वय ७५ वर्षे झाल्यानंतर त्याने सत्तेच्या पदावर राहू नये असा मोदींचा नियम आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना हा नियम लागू केला होता. मोदी आता या नियमापलिकडे आहेत का? मोदींनी जेव्हा हा नियम केला होता तेव्हा त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील मान्यता होती. मोदी येत्या १७ सप्टेंबर रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यामुळे त्यांच्या नियमाबाबत, निवृत्तीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींना आमंत्रित केलं होतं.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमधील चार दारु दुकानांची ‘बाटली आडवी’
बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ती मोगली संस्कृती आहे, अशी कितीही वक्तव्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तरी त्यांना बोलू द्या. मात्र, मोदींच्याच नियमानुसार त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावं लागतंय. अवतारकार्य संपलं की सर्वांनाच जावं लागतं. राम, कृष्ण आले आणि त्यांचं अवतारकार्य संपल्यावर निघून गेले. आता मोदींचं अवतारकार्य संपलंय, त्यांनाही निघून जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.
फडणवीस सांगतायत की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, ती मोगली संस्कृती आहे वगैरे, वगैरे… मात्र, औरंगजेबाने शहाजहानला कोंडून ठेवलं होतं, त्याचप्रमाणो मोदींनी लालकृष्ण आडवाणी जिवंत असतानाही त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि स्वतः पंतप्रधान झाले. मुळात लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीचा डोलारा उभा केला आहे. भारतीय जनता पार्टीला दोन खासदारांपासून सत्तेच्या शिखरापर्यंत नेण्याचं काम लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या लोकांनीच केलं आहे. आडवाणी यांनी अयोध्येचं आंदोलन केलं होतं, असंही संजय राऊत म्हणाले.