अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांचं सूचक विधान

मुंबई | मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आङे. महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत संजय राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की यंदाची निवडणूक एखाद्या महायुद्धाप्रमाणे लढली जाईल. फक्त महाराष्ट्रातील जनता यावेळी एवढेच पाहिल की, महाराष्ट्र द्रोह्यांना कोण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, असे जे कालपर्यंत बोलत होते. ते अप्रत्यक्षपणे मोदी-शाहांना महाराष्ट्र गिळंकृत करत यावा, म्हणून मदत तर करत नाहीत ना? हे या राज्याची जनता काळजीपूर्वक पाहणार आहे.
हेही वाचा – कोथरुड येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांत स्वाक्षरी मोहिमेद्वारे मतदार जागृती
शिवेसना हा असा पक्ष आहे. ज्याने कधीही महाराष्ट्र द्रोह्यांशी हातमिळवणी केली नाही. महाराष्ट्रासाठी छातीवर वार झेलून शिवसेना लढत राहिली. यापुढे लढत राहिल. या लढाईत आमच्याबरोबर जे येतील, ते महाराष्ट्राचे. जे आमच्याबरोबर येणार नाहीत, ते महाराष्ट्राच्या शत्रूंना निर्णायक क्षणी मदत करत होते, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात होईल, असं संजय राऊत म्हणाले.
अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा आहे. निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाहीत विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकजण निवडणूक लढवू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने माहिम विधानसभेत महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.