‘संतपीठा’तर्फे ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा; कलाकार-विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ

पुणे, प्रतिनिधी : शास्त्रीय संगीत, अभंग गायन आणि वाद्यवादन क्षेत्रातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधर्व मंच’ ही आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेमुळे देश-विदेशातील कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ही स्पर्धा विशेषतः ९ ते ४० वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी खुली असून, शास्त्रीय गायन, संत रचित अभंग गायन, तबला (एकल) आणि पखवाज (एकल) या प्रमुख प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून संतपरंपरेतील संगीत वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंती वर्षाचे स्मरण आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ च्या १२५ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. संतांच्या अभंग परंपरेत संगीताचे अनन्यसाधारण महत्त्व असून, वारकरी संप्रदायाने ही परंपरा शतकानुशतके जपली आहे.
हेही वाचा : तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी शेवटच्या बैठकीत किती हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली?
“संगीताच्या माध्यमातून संतविचार समाजात अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतात. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील प्रतिभावान कलाकारांनाही संधी मिळेल.”
-डॉ. सदानंद मोरे, संचालक, संतपीठ.
स्पर्धेसाठी आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली असून, राज्यभरातून तसेच परदेशातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संतपीठाचे संचालक राजू महाराज दोरे यांनी दिली.
स्पर्धेची पहिली फेरी ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, अंतिम फेरी ५ आणि ६ जून रोजी चिखली येथील संतपीठात होईल. विजेत्यांचा गौरव सोहळा ७ जून रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडणार असून, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे संगीत क्षेत्रातील नवोदित कलाकारांना जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार असून, संतपरंपरेचा सांस्कृतिक वारसा अधिक बळकट होणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





