विमानाचं भव्य कटआऊट, रांगोळी अन्…; नाटकाच्या ६०० व्या प्रयोगाला जिवलग मित्रांचं खास Surprise! संदीप पाठकची भावुक पोस्ट…

Sandeep Pathak : ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग नुकताच पुण्यात पार पडला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रेक्षकांनी या नाटकाचं भरभरून कौतुक केलंच पण, एका खास कारणामुळे हा प्रयोग अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
अभिनेता संदीप पाठकला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी या ६०० व्या प्रयोगादरम्यान खास सरप्राइज दिलं. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही झाले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत करण्यात आलं. यावेळी अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; चर्चा निष्फळ
या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठकने भावना व्यक्त करत सांगितलं, “आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं जिवलग मित्रांकडून सरप्राइज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे.” प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड’ हे एकपात्री नाटक गेली अनेक वर्षं मराठी रंगभूमीवर रसिकांचं मन जिंकत आहे. अभिनेता संदीप पाठकने या नाटकाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. अस्सल मराठवाडी बोली, बावन्न व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, भिन्न आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जेनं साकारलेलं हे नाटक आजही तितकंच टवटवीत आणि प्रेक्षकप्रिय ठरत आहे.





