पिंपरीत निष्ठवंताला संधी : आमदार आण्णा बनसोडे यांच्या रथाचे योगेश बहल ‘सारथी’
महायुतीच्या तीनही जागा निवडून आणणार : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा निर्धार
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नियुक्ती दुसऱ्याच दिवशी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी जाहीर झाली. तर, मावळमधून आमदार सुनील शेळके यांनाही पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून बनसोडे दोनदा, तर शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार एकदा निवडून आले होते. आता बनसोडे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.
वास्तविक, प्रचंड विरोध असतानाही अजित पवार यांनी आपले अत्यंत निष्ठावान आमदार बनसोडे यांच्यावर विश्वास दाखवत तिकीट जाहीर केले आहे. दादांचाच एक निष्ठावंत आमदार असताना बाहेरचे उमेदवार आयात करण्याची काय गरज? असे म्हणत दादांनी बंडाचा झेंडा फडकावणाऱ्यांना जोरदार झटका दिला.
दरम्यान, पक्षात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण, पक्ष कोणालाही तिकीट देण्याचा निर्णय घेवू दे… पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचे तीनही आमदार निवडून आणणार, असे घोषणा योगेश बहल यांनी केली आहे. त्यामुळे आमदार आण्णा बनसोडे यांच्या रथाचे सारथी बहल होतील, असा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.
नाराज माजी नगरसेवकांची समजूत काढणार…
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे खाऊ घालत आनंदोत्सव साजरा केला. अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे अत्यंत निष्ठावान नेते मानले जातात. मात्र, महायुतीच्या काही माजी नगरसेवकांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केला. मात्र मला वैयक्तिक कोणी विरोध केला नसून, तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांनी माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचा दावा अण्णा बनसोडे यांनी केला आहे. महायुतीतील सर्व असंतुष्ट माजी नगरसेवकांची भेट घेऊन लवकरच त्यांची नाराजी दूर करून सर्वांना सोबत घेऊन प्रचार करणार असल्याचा दावा अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
शहराध्यक्ष योगेश बहल ठरणार ‘किंगमेकर’…
आमदार अण्णा बनसोडे यांच्या उमेदवारीला माजी नगरसेवकांचा तीव्र विरोध होता. बनसोडे यांना तिकीट दिल्यास ते काम करणार नाहीत, असेही अजित पवार यांना सांगण्यात आले. दबाव आणल्यास त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन घरी बसणे पसंत केले. मात्र, बनसोडे यांची कामे करणार नाहीत, असा इशाराही दिला होता. मात्र, ‘‘निवडून येण्याची क्षमता’’ या निकषाच्या आधारे बनसोडे यांचे तिकीट निश्चित करण्यात आले. याउलट, पक्ष ज्याला उमेदवार घोषित करेल त्याला निवडून आणणे हे माझे काम आहे, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिलवंत आणि बहल यांच्या प्रचंड राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे बहल मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहेत. आण्णा बनसोडे आणि योगेश बहल यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पिंपरीचे मैदान राष्ट्रवादी अजित पवार गट मारणार, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्याची आवश्यकता नाही.





