पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमृता फडणवीसांनी फ्रान्समधील ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चा दौरा केला रद्द

Amruta Fadnavis : अमेरिका-इराण युद्धाचा जगातील अनेक देशांना फटका बसत आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या या तणावाचा भारतावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार अधिक सावध भूमिका घेत असून आता उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. त्या अनुषंगानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीच्या काटकसरीचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशभरात अनेक नेत्यांकडून अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अनेक नेत्यांनी आपले नियोजित परदेश दौरे पद्द केले आहेत, तसेच ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीस यांनी देखील त्यांचा फ्रान्समधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा नियोजित दौरा रद्द केला आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
“प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आणि हातमागाचा वारसा जागतिक पातळीवर मांडण्याची ही संधी होती. त्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी संधीही मिळाली होती. मात्र, देशहिताला प्राधान्य देणं ही आपली जबाबदारी आहे. रेड कार्पेटची संधी पुन्हा मिळेल. मात्र, देशाला प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे”, असं सांगत अमृता फडणवीस यांनी त्यांचा कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी जाण्याचा फ्रान्समधील दौरा रद्द केल्याचं सांगितलं आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनावश्यक खर्च कमी करण्याच्या आणि देशाला प्राधान्य देण्याच्या दिशेनं हे माझं पाऊल असल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं. इंधनाची बचत करणं आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. मोदी म्हणाले होते की, “आपण पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये मेट्रो आहेत, तिथे लोकांनी मेट्रोचा वापर केला पाहिजे. बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होम या सारख्या उपाययोजना राबण्याची गरज आहे.”
पंतप्रधान मोदींनी काय आवाहने केलेली आहेत?
-शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या.
-वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा.
-सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा.
-पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा.
-स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा.
-रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा.
-स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा.
-वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा.





