Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

मान्सूनने पकडला वेग; अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच, केरळात वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता

Monsoon News :  दक्षिण-पश्चिम मान्सूनने वेग पकडत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर तसेच अंदमान-निकोबार परिसरात आगेकूच केली असून केरळात तो यंदा वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून आणखी सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने शनिवारी सांगितले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, दक्षिण-पश्चिम व दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच संपूर्ण निकोबार बेटांमध्ये पुढे सरकला आहे. श्री विजयपुरमसह अंदमान बेटांच्या काही भागांमध्येही मान्सूनचे आगमन झाले आहे.

पुढील काही दिवसांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, दक्षिण-पश्चिम व दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. तसेच अंदमान समुद्र व अंदमान बेटांच्या उर्वरित भागांसह पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांतही मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, केरळात २६ मेपर्यंत दक्षिण-पश्चिम मान्सून पोहोचू शकतो. सामान्यतः केरळात मान्सूनचे आगमन १ जूनच्या सुमारास होते. त्यानंतर देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळ्याच्या हंगाम होतो.

हेही वाचा –  ‘बारव संवर्धनाला प्राधान्य देत अतिक्रमण हटाव मोहीम राबवा’; मंत्री ॲड. आशिष शेलार

यापूर्वी हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली होती. यामागे ‘अल नीनो’ परिस्थिती सक्रिय होण्याची शक्यता कारणीभूत ठरू शकते. अल नीनोमुळे देशातील पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

दरम्यान, देशात उष्णतेची लाट (हीटवेव्ह) घोषित करण्यासाठी वापरले जाणारे विद्यमान निकष बदलण्याचा निर्णयही IMD ने घेतला आहे. भारताच्या विविध भौगोलिक परिस्थितींशी सध्याचे निकष पूर्णपणे सुसंगत नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे.

विशेषतः केरळसारख्या राज्यांत उष्णतेच्या लाटेबाबत इशारा देताना अडचणी येत असल्याने सुधारित निकषांची गरज भासत असल्याचे IMD मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा दक्षिण भारताच्या जवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळीय प्रणालीमुळे रात्रीचे तापमानही असामान्यरीत्या वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत केरळमध्ये उन्हाळ्यात तापमान सातत्याने वाढत असल्याने सुधारित निकषांमुळे अधिक प्रभावी आणि वेळेवर इशारे देणे शक्य होईल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button