उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष संपुष्टात येईल; भाजप नेत्याचे वक्तव्य

मुंबई | भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी दानवे म्हणाले की, मागच्या निवडणुकीचा मी साक्षीदार आहे, तेव्हा मी अध्यक्ष होतो. मागच्यावेळी एकत्र सरकार चालवत असल्यामुळं आम्ही त्यांना पालिका दिली होती. नाहीतर आम्ही आमचा महापौर बसवला असता असे दानवे म्हणाले. ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे, निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. कार्यकर्ते आपलं आपलं भविष्य स्वीकारतील असे दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे म्हणाले, की आज लोकसभेत आलो होतो, ओम बिर्लांसह इतर नेत्यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याशीही माझी भेट होणार आहे. दिल्लीत आल्यानंतर जुन्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो त्यासाठी काही कारण लागत नाही. मी २५ वर्षे दिल्लीत होतो त्यामुळे अनेक मित्र या ठिकाणी आहेत. प्रदीप पाटील यांच्याही घरी जाऊन मी भेटून आलो.
हेही वाचा : अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, त्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे आमच्या सरकारने दाखवून दिल्याचे दानवे म्हणाले. नवाब मलिक यांनी जेलमध्ये गेले तरी राजीनामा दिला नव्हता, पण माणिकराव यांनी राजीनामा दिल्याचे दानवे म्हणाले. काल त्यांचा निकाल झाला आणि ते अॅडमिट झाले होते. जे झालं ते नियमाने झाल्याचे दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. लोकसभेला त्यांना थोडं यश मिळालं. विधानसभेला सपाटून मार खाल्ला. त्यानंतर आता महापालिकेसाठी दोघं भाऊ एकत्र आले आहेत. निवडणुकीनंतर त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर राहणार नाहीत. फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबाबत मी काही बोलणार नाहीत. या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्तित्त्वात राहणार नाही. त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जातील कदाचित राज ठाकरेंचं नेतृत्वही मान्य करतील पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच एका पक्षात राहतील, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.





