‘सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक तंत्रज्ञानाधारित करणार’;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य शासन कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात दुर्धर आजारांचे लवकर निदान, कमी खर्चाची उपचार पद्धती विकसित करणे आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पल्स वैद्यकीय परिषदेत बोलत होते.
वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दोन दिवसीय ‘पल्स वैद्यकीय परिषद 2026’ वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद राज्याच्या वैद्यकीय धोरणाला आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला नवे दिशा-दर्शन मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आयुक्त अनिल भंडारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी अन्बळगण, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारसू आदी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील
प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, या सेवा नागरिकांच्या निवासस्थानापासून आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) चा प्रभावी वापर करण्यावर राज्य शासनाचा विशेष भर असून, यामुळे आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवताना गुणवत्ताही टिकवून ठेवता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्याला केवळ अधिक डॉक्टर घडवायचे नाहीत, तर भविष्यातील आरोग्य आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे सक्षम डॉक्टर तयार करायचे आहेत. राज्यातील जिल्हा रुग्णालये, तालुका रुग्णालये आणि महापालिका रुग्णालये बळकट करण्यावर सरकारचा विशेष भर असून, आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासोबत वैद्यकीय शिक्षणाच्या एकूण परिसंस्थेला बळकटी दिली जात आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासोबतच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा वाढविण्यावर शासन लक्ष केंद्रित करत आहे. ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दृष्टीकोनात आरोग्य क्षेत्र हे केवळ सामाजिक जबाबदारीपुरते मर्यादित नसून, नावीन्य, गुंतवणूक आणि आर्थिक वाढीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य व्यवस्थेचे प्रभावी सनियंत्रण करण्यासाठी नागपूर येथे विशेष संस्था स्थापन करण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून नागरिकांना परवडणारी आणि सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहोत. ‘पल्स’ व्यासपीठातून गुणवत्ता, सातत्य आणि परवडणारी आरोग्यसेवा यावर भर दिला जात असून, वैद्यकीय शिक्षणात गुणवत्ता, संशोधन व स्वायत्तता वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘महा केअर’ मॉडेल व वाधवानी एआयच्या मदतीने आरोग्य व्यवस्था उपचार केंद्राकडून प्रतिबंधक व प्री-केअर दिशेने वळत आहे. ‘पल्स’ परिषद ही धोरण, व्यवहार आणि नाविन्य यांना जोडणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असून, या माध्यमातून विविध क्षेत्रांत गुंतवणूक व सामंजस्य करार होणार आहेत. ‘या परिसंवादातून भविष्यातील आरोग्य धोरणांना दिशा मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.





