अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Rupali Chakankar Resignation : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली असून एसआयटी पुढील चौकशी करत आहे. मात्र, याच अशोक खरातची पाद्यपूजा करताना रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी (अजित पवार) महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांना अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या राजीनाम्याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत माहिती दिली आहे.
“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक तंत्रज्ञानाधारित करणार’;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अशोक खरात प्रकरणात झालेल्या टिकेनंतर काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती त्यांनीच दिली होती.
स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडलं आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. खरातच्या सेक्स स्कँडलने राज्यात खळबळ माजवली असताना रोज या प्रकरणी नवीन खुलासे समोर येत आहेत.





