‘धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला उशीर’; पंकजा मुंडेंचं वक्तव्य

मुंबई | बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात मला कल्पना नव्हती. आज सकाळी नागपूरला आल्यावर समाज माध्यमांवरून ही माहिती मिळाली. या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असल्यापासून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी सर्वात आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली होती. चौकशी समितीने दोषारोप पत्र सादर केल्यानंतर समोर आलेले व्हीडीओ पाहण्याची माझ्यात हिंमत नाही. हा अमानवी प्रकार आहे. या संपूर्ण प्रकारावर मी संतोष देशमुखच्या आईची माफी मागते. मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे अशा अमानवी घटनांमुळे त्यांच्यावर काय परिणाम झाले असतील हे मी समजू शकते, असे म्हणत पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडेंनी आधीच राजीनामा दिला असता तर पदाची प्रतिष्ठा राहिली असती. मी त्याची लहान बहीण असून कुठल्याही परिवारासाठी ही दु:खद घटनाच आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर याला जातीय रंग देण्यात आला. परंतु, ज्या आरोपींचे फोटो समोर आलेत ते कुठल्या जाती धर्माचे आहेत हा विषय आता उरला नाही. आरोपींना कुठलीही जात नसते. आम्ही जेव्हा मंत्रीपद किंवा आमदारकीची शपथ घेतो तेव्हा जात धर्म हा विषय आमच्यासाठी संपला असतो. कुणाविषयीही ममत्व भाव आम्हाला ठेवता येत नाही. त्यामुळे आरोपी कुठल्याही जातीचा असतो. त्याला कठोर शासन व्हायला हवे हीच आपली मागणी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.