धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

Ajit Pawar | बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.
हेही वाचा : ‘त्या’ औरंग्याने माझ्या राजासमोर भिक मागितली! उदात्तीकरण काय करतो?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता.