गवळीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा झंझावात
मिशन- PCMC: ‘घड्याळा’चा गजर करत उमेदवारांनी पिंजून काढला प्रभाग

पिंपरी-चिंचवड | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन सघन जनसंपर्क साधत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
‘नगरसेवक नाही, तर लोकसेवक’ या भूमिकेतून प्रचाराला सुरुवात केल्याने नागरिकांकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांत सत्तेत नसतानाही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याची पावती यावेळी मतदारांकडून मिळत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : प्रभाग ७ मध्ये विराज लांडे यांचा प्रचार जोरात, गव्हाणे तालीम परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियंका बारसे, भीमाताई फुगे (काकी), अमर फुगे आणि राहुल गवळी हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्व उमेदवार स्थानिक रहिवासी असल्याने प्रभागातील प्रश्नांची त्यांना सखोल माहिती आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, नागरिकांच्या अडचणी आणि रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मतदारांच्या स्मरणात असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे. “आम्ही याच परिसरातील असल्याने येथील प्रत्येक प्रश्न आमचा स्वतःचा आहे,” अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
आज झालेल्या प्रचार फेरीत उमेदवारांनी प्रभागातील सर्व गृहनिर्माण सोसायट्या तसेच गावठाण भाग पिंजून काढला. ‘एकच वादा, अजित दादा’ आणि ‘अजित दादांनी दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अनेक ठिकाणी महिला मतदारांनी औक्षण करून उमेदवारांना विजयासाठी आशीर्वाद दिले. “गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही सत्तेत नसलो तरी जनतेची सेवा कधीही थांबवली नाही. सामाजिक कामे असोत वा वैयक्तिक अडचणी, आम्ही नेहमीच नागरिकांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. यावेळी मायबाप जनता ‘घड्याळा’ला भरभरून मतदान करेल, याची आम्हाला खात्री आहे,” असे भीमाताई फुगे (काकी) आणि प्रियंका बारसे यांनी सांगितले.




