नववर्षाच्या सुरुवातीला जळगावमध्ये दोन गटात तुफान हाणामारी
पाळधी गावात तणावपूर्ण शांतता
जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना घेऊन जाणाऱ्या कारने धक्का दिल्याने जळगावच्या पाळधी गावात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. तसेच गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नववर्षांच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर आता पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (३१ डिसेंबरच्या रात्री ) पाळधी गावातून गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबियाला घेऊन कार चालली होती. त्यावेळी त्यांच्या गाडीचा धक्का लागल्याने तुफान राडा झाला. गाडीचा धक्का लागल्याने पाळधी गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केली. यावेळी वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले.
सुरुवातीला दोन गटात शाब्दिक वाद झाला. मात्र, वाद इतका विकोपाला गेला, की वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. त्यानंतर काही समाजकंटकानी रात्री १ वाजताच्या सुमारास गॅरेजसमोरील तीन ते चार चारचाकी वाहने पेटवून दिली. त्यानंतर गॅरेजमधील कामगार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडून वाहने विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले.
या घटनेची माहिती अग्निशमन दलालाही देण्यात आली. पण अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचेपर्यंत पेटवण्यात आलेली सर्व वाहने जळून खाक झाली होती. यावेळी पोलिसांनाही घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.





