ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच

राष्ट्रवादी शरद पवार गटात मुरबाडच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर

मुरबाड : विधानसभेच्या निवडणुका घोषित होऊन आठवडा उलटत नाही तोच, मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यातच माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवारही मुरबाडच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

मात्र आता आयात उमेदवाराला संधी देऊ नये, तसे झाल्यास अश्या आयात उमेदवाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात मुरबाडच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुरबाड विधानसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख व हेमंत रुमणे आणि शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पक्षाकडे अर्ज करून मुलाखती दिल्या आहेत. यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाल्यास त्या उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम करू, पण आयात उमेदवार नको, अशी भूमिका शैलेश वडनेरे यांनी बदलापूरात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. जर पक्षाने मुरबाड मतदारसंघासाठी इतर पक्षातील आयात उमेदवाराला संधी दिली तर त्या उमेदवाराला मतदारसंघात फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिला.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे बदलापूर मधील शेकडो पदाधिकारी या विरोधात राजीनामा देणार असल्याचेही वडनेरे यांनी स्पष्ट केले. यावेळी मुरबाड तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मुरबाडच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात वातावरण चांगलेच तापले आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघात भाजपाचे किसन कथोरे विद्यमान आमदार आहेत. सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपकडे राहण्याची व पुन्हा कथोरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार मैदानात उतरविण्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचा प्रयत्न आहे. माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष पवारही मुरबाड विधानसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप त्यांचा प्रवेश झालेला नाही. त्यात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी ‘आयात उमेदवार नकोच’ अशी भूमिका घेत अप्रत्यक्षपणे सुभाष पवारांच्या उमेदवारी विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे मुरबाड मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारी नक्की कोणत्या उमेदवाराकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेत मुरबाड तालुक्यातील विविध पक्ष सलग्न संघटना, तसेच आघाडीतील मित्र पक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे वडनेरे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वडनेरे यांनी निवडणुकी पूर्वी च आपले शक्ती प्रदर्शन दाखवल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button