Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार ; कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याचा अंदाज

मुंबई : राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू असून मागील तीन दिवसांपासून मोसमी पावसाची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे स्थिर आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत राज्यातील अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात वादळी पाऊस आणि पूर्व मोसमी पावसामुळे कमाल तापमानामुळे काहीशी घट झाली होती, त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस अजूनही सक्रिय झाला नसून मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांवर असलेला वादळी पावसाचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसत आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही मुंबईसह उत्तर कोकणात उष्मा कायम असून विदर्भातील बहुतांश भागातील कमाल तापमानात मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी वर्धा येथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर ब्रम्हपुरी ४४.२, नागपूर ४४, अकोला ४३.४, तर यवतमाळ येथे ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागातही कमाल तापमानात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून पुढील तीन दिवसांत उन्हाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा –  ‘विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोसमी पावसाने गुरुवारी कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांसह तमिळनाडूच्या उर्वरित भागांमध्ये, तसेच पश्चिम बंगालच्या आणखी काही भागात आणि बिहारच्या काही भागात वाटचाल केली, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तर महाष्ट्रात त्याची सीमा स्थिर असून पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल होण्यास हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे राज्यातील नागरिकांना पुढील काही दिवस मोसमी पावसाची प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज आहे. दरम्यान, कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी उष्ण आणि दमट वातावरण, तर काही भागात वादळी पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात १८ जूनपासून पावसाचा जोर वाढेल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मुंबईसह पालघर आणि ठाणे येथे गुरुवारी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. त्यामुळे येथील नागरिकांना सध्या तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून गुरुवारी हवामान विभागाच्या कुलाबा येथे ३६ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस आणि दोन्ही केंद्रावर किमान तापमान ३० अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथे शुक्रवारी आणि शनिवारी उष्ण आणि दमट वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मुंबईत मोसमी पाऊस दाखल होण्याची सरासरी तारीख १० ते ११ जून मानली जाते. मात्र, यंदा हवामान स्थिती अनुकूल

नसल्याने आणि पूर्व मोसमी पावसानेही मुबईकरांना दिलासा मिळत नसून मोसमी पाऊसही लांबण्याची चिन्हे आहेत, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबई शहरात शुक्रवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button