MLA महेश लांडगे यांचे पिंपरीतील भाषण अन् NCP ची अक्षरश: झोप उडाली?
मिशन- PCMC : शहराच्या इतिहासात पहिल्यांदा पवार कुटुंबियांनी तळ ठोकला
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल, असे निश्चित होते. अपेक्षेप्रमाणे तसेच झाले. मात्र, राष्ट्रवादीला भाजपाविरोधात वातावरण निर्मिती करता येत नव्हती. पिंपरीत आमदार महेश लांडगे यांचे भाषण झाले. त्या ठिकाणी ‘‘स्पार्क’’ झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची यंत्रणा एकट्या महेश लांडगे यांच्यावर तुटून पडली. सोशल मीडियावर ते ‘‘ट्रोल’’ होवू लागले.
वास्तविक, पिंपरीत पहिल्यांदा सभा अजित पवारांची झाली होती. त्या सभेत त्यांनी महेश लांडगे आणि भाजपावर बेच्छुट आरोप केले. त्याअगोदर पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामध्येसुद्धा विकासाच्या मुद्यांवर नव्हे, तर महापालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या मुद्यांवर त्यांनी भाजपा आणि महेश लांडगे यांना ‘टार्गेट’ केले. मात्र, पिंपरीतील महेश लांडगे यांची प्रत्त्युत्तर सभा निर्णायक ठरली. किंबहुना, ही सभा महापालिका निवडणुकीचा ‘‘टर्निंग पॉईंट’’ ठरणार आहे. कारण, या सभेत आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा स्वाभिमान जागृत केला. पिंपरी-चिंचवडकर स्वत:चे निर्णय स्वत: घेवू शकतात..आपल्याला कुणाच्या दारात जाण्याची गरज नाही… अशी भावनिक साद घातली. या सभेत उपस्थिती ज्येष्ठांच्या डोळ्यांत पाणी पहायला मिळाले.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना कसे जाळ्यात पकडण्यात आले? 30-35 वर्षांत स्थानिक भूमिपुत्र नेत्यांना राष्ट्रवादीने कसे बदनाम केले. स्थानिक नेतृत्त्व मोठे होवू नये. किंबहुना, ‘‘पिंपरी-चिंचवडकर नेत्यांनी कायम पवारांच्या पायाशी स्वाभिमान ठेवला पहिजे’’ अशी यांची भावना आहे. त्यामुळेच ही मंडळी षडयंत्र करीत आहेत. त्यामुळे आता भूमिपुत्रांनी जागृत झाले पाहिजे. आपल्यातील एखादं नेतृत्व मोठं होवू द्या. त्याला मदत करा. कितीदिवस आजोबा, पुतण्या त्याचा मुलगा यांच्यासाठी गाड्या हाकायच्या..? असा स्वाभिमानी हुँकार महेश लांडगे यांनी दिला.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर गावकी-भावकी, नाती-गोती यांचा मोठा पगडा आहे. गावकी भावकी एक झाली, तर राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्यासारखेसुद्धा संख्याबळ मिळणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसऱ्या बाजुला महेश लांडगे यांनी विधानसभा निवडणुकीत 22 नगरसेवकांचे राष्ट्रवादीत इनकमिंग केल्याचा वचपा आता महापालिका निवडणुकीत काढला. निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे 22 नगरसेवक भाजपात दाखल करुन घेतले. त्यामुळे ही निवडणूक भाजपाच्या बाजुने झाली होती. भ्रष्टाचाराच्या मुद्याला 70 हजार कोटींचा कथित घोटाळा, पुण्यातील महार वतनाच्या जमीनीचा घोटाळा अशी जोड दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अक्षरश: अवसान गळाले.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे किंबहुना पुणे जिल्ह्यातील वर्चस्वाची लढाई असल्यामुळे राष्ट्रवादी आणि दस्तुरखुद्द अजित पवार यांची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. पिंपरीतील महेश लांडगे यांची सभा निर्णायक ठरणार… गावकी-भावकी, नाती-गोती एक होणार… या भितीने धास्तावलेल्या राष्ट्रवादीने अखेर ‘‘अजितदादांचा ऐकेरी शब्दांत उल्लेख केला…’’ असे ‘‘व्हीक्टिम कार्ड’’ वापरले. त्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी पुण्यातील रुपाली ठोंबरे यांच्यापासून सुरज चव्हाण यांच्यापर्यंत आणि अमोल मिठकरीपासून विकास लवांडे यांच्यापर्यंत सगळी यंत्रणा कामाला लागली. ट्रोलिंग एजन्सीच अक्षरश: तुटून पडल्या. प्रसारमाध्यमांमधून विविध अँगल्सनी बातम्या पेरण्यात आल्या. मात्र, यामुळे राष्ट्रवादीला फायदा होणार नाही, उलट महेश लांडगेंप्रति महाराष्ट्रभरात सहानुभूती निर्माण झाली. आधी त्याच्यावर आरोप केले, तुमच्यावर आल्यावर मग का त्रागा-का त्रास होतो, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीची हवा काढली..!
राज्यातील महायुती सरकारमध्ये एकत्रित असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च्या पक्षाचे आमदार महेश लांडगे यांचे कान टोचतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीला होती. मात्र, तसे झाले नाही. उलटपक्षी, फडणवीस यांनी लांडगेंची पाठराखण केली. ‘‘त्यांच्याकडे स्वत:च्या सत्ताकाळात केलेली कामे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना वाद-विवाद, सवाल-प्रतिसवाल झाला पाहिजे, अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडे लक्ष देवू नका. आपण केलेली कामे लोकांना सांगा. पिंपरी-चिंचवडमधील नागरिक भाजपासोबत आहेत, ’’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आकुर्डीतील जाहीर सभेत महेश लांडगेंना दिला. याच सभेत ‘‘महायुतीमधील नेत्यांचा आदर फक्त भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच ठेवायचा का?’’ असा प्रश्न लांडगे यांनी केला. यावर CM फडणवीस म्हणाले की, ‘‘परिंदे को मिलेगी मंजील एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते है । और वहीं लोग रहतें है खामोश अक्सर जमानें में उनके हुनर बोलते है।’’ आपलं काम बोलतंय… आणि त्यामुळेच या समोरच्या लोकांचा वैताग आहे. कोणताही राजकीय आरोपाला उत्तर न देता मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची सर्व हवा काढून घेतली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
पार्थ पवार यांच्या पराभवाची पुनरावृत्ती होणार?
2019 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यावेळी स्थानिक भूमिपुत्राला मावळची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिकांची संधी डावलून राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. त्यावेळी स्थानिक भूमिपुत्रांचा स्वाभिमान दुखावला होता. त्याची परीणिती निकालात झाली. पार्थ पवार यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव झाला. त्यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचे राज्यातील बडे-बडे नेते आणि एजन्सीज पिंपरी-चिंचवड आणि मावळात दाखल झाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीला विजय मिळवता आला नाही. त्याअगोदर 2017 मध्ये ‘‘नको बारामती… नको भानामती’’ अशी घोषणा भाजपाने दिली. त्यावेळी राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली होती. आता पुन्हा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘पिंपरी-चिंचवडकरांनो आपला स्वाभिमान जागृत ठेवा…म्हणा मी स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर…’’ अशी घोषणा केली. यावर राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या यंत्रणेकडून महेश लांडगे यांच्यांविरोधात खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे 2017 महापालिका निवडणूक 2019 पार्थ पवार यांच्या पराभवाची पुनरावृत्ती या महापालिका निवडणुकीतसुद्धा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात.




