मिशन-PCMC: राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड हमीपत्र जाहीर!
मेट्रो-पीएमपीएमएल मोफत प्रवास, ५०० चौ.फुट घरांना करमाफी, विद्यार्थ्यांना टॅबलेट

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी हमीपत्र जाहीर केले आहे. मेट्रो व पीएमपीएमएल बस प्रवास मोफत, विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट, ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकर माफी, रोज नळाद्वारे पाणीपुरवठा व टँकरमुक्त शहर, वादग्रस्त सुधारित विकास आराखडा (डीपी) रद्द करणे, लाडक्या बहिणींना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज आदी प्रमुख आश्वासने या हमीपत्रात देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षांच्या वतीने ‘संकल्प सात, पुन्हा सुरुवात’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या हमीपत्राचे प्रकाशन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते.
अजित पवार यांनी सांगितले की, “हे हमीपत्र पिंपरी-चिंचवडकरांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. सत्ता मिळताच या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी केली जाईल.”
प्रमुख हमी व योजना
रोज नळाद्वारे पाणी, टँकरमुक्त शहर :
सर्व प्रभागांत उच्च दाबाने दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक तीन महिने आधी जाहीर करण्यात येईल. टँकरमाफियांचे १०० टक्के उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून प्रत्येक प्रभागात सामुदायिक विहिरी व दीर्घकालीन जलव्यवस्थापन आराखडा राबविण्यात येणार आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी मोबाईल सेन्सर व्हॅन्स तैनात केल्या जातील.
पवना, भामा आसखेड प्रकल्प :
पवना प्रकल्पाची रखडलेली पाईपलाईन व भामा आसखेड प्रकल्पातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जातील.
मेट्रो व पीएमपीएमएल मोफत :
सर्व नागरिकांसाठी मेट्रो व पीएमपीएमएल बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी फिडर बस सेवाही उपलब्ध होणार आहे.
मालमत्ताकर माफी :
१ एप्रिल २०२६ पासून ५०० चौ.फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ केला जाणार आहे. याचा थेट लाभ मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक व लहान घरमालकांना मिळणार आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार विलास लांडे सरसावले !
विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट :
डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट देऊन डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाणार आहे.
लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज :
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा उद्योग विस्तारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
शहरी गरीब आरोग्य योजना :
पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये शहरी गरीब आरोग्य योजना सुरू करण्यात येणार आहे. सामान्य आजारांसाठी २ लाख व गंभीर आजारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंत उपचार सहाय्य दिले जाणार आहे. बर्न वॉर्ड, कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, टेलिमेडिसिन, स्वस्त दरात MRI व CT स्कॅन आदी सुविधा देण्याचे आश्वासन आहे.
१०० मॉडेल शाळा :
महापालिकेच्या १०० शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर, सीबीएसई व आयसीएसई मानांकनाच्या नवीन शाळा, आधुनिक प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा व कोणतेही अतिरिक्त शुल्क नसलेले शिक्षण देण्यात येणार आहे.
डिपी रद्द, मालमत्तांचे संरक्षण :
वादग्रस्त सुधारित विकास आराखडा रद्द करण्यात येणार असून कायदेशीर मालमत्तांचे पूर्ण संरक्षण दिले जाईल. गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया ऑनलाइन व पारदर्शक करण्यात येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन :
विस्थापनाऐवजी पुनर्वसनावर भर देत स्वतंत्र एसआरए कक्ष स्थापन केला जाईल. तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण न झाल्यास वाढीव भाडे देण्याची तरतूद असेल.
नवीन कनेक्टिव्हिटी व मेट्रो लाईन :
निगडी–रावेत–वाकड टेक कॉरिडॉर, मोशी–चिखली–तळवडे ग्रोथ कॉरिडॉर, औद्योगिक लूप, उड्डाणपूल, अंडरपास व वाकड–पिंपळे सौदागर–भोसरी–चाकण नवीन मेट्रो लाईन सुरू करण्याचा समावेश आहे.
कला व क्रीडा :
कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रासाठी स्वतंत्र कृती आराखडा सात दिवसांत सादर केला जाणार आहे. या सात हमींच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.




