खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, मराठ्यांच्या अन्नात..

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ केंद्र सरकारच सोडवू शकतं, ही गोष्ट केंद्र सरकारच्या हातात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवावी, असं खासदार ओम राजेनिंबळकर म्हणाले होते. निंबाळकरांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, कदाचित ओम राजेनिंबाळकर यांना काही माहिती नसेल. मराठ्यांनी ओबीसीमधून (कुणबी जातप्रमाणपत्रासह) आरक्षणाची मागणी केली आहे. याचाच अर्थ आम्हाला ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण हवं आहे आणि आम्ही ही मागणी लावून धरली आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण यात मुसळ घालू नये. बोलायचं असेल तर नीट बोला, नाहीतर बोलू नका. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलायचं असेल तर नीट बोला नाहीतर गप्प बसा. उगाच काहीही बोलून मराठ्यांच्या अन्नात माती कालवायचं काम करू नका. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी आम्ही केली आहे आणि तेच आमच्या हक्काचं आरक्षण आहे. मराठे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत आहेत.
हेही वाचा – पंकजाताई, भुजबळ साहेब आम्हाला आरक्षण मिळू द्या..; भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
तुम्हाला देखील मराठा समाजासाठी आरक्षण मागायचं असेल तर ओबीसीतून मागणी करा, नाहीतर गप्प बसा. हे आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे… राज्य सरकारच्या हातात आहे… असली वक्तव्ये करून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर कोट्यवधी गोरगरीब मराठा लेकरांच्या बाजूने बोला, अन्यथा बोलू नका, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ओम राजेनिंबाळकर काय म्हणाले?
केंद्र सरकारला सांगून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवावी, जेणेकरून राज्य सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाबाबत जो निर्णय घेतला आहे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयात देखील टिकेल. त्यामुळे याबाबतीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सकारात्मक भूमिकेतून पावलं उचलणं गरजेचं आहे. ती पावलं उचलावी ही आमची सर्वांची अपेक्षा आहे, असं खासदार ओम राजेनिंबाळकर म्हणाले.





