‘नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार’; मनोज जरांगेची घोषणा

Manoj Jarange Patil | विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. या निवडणुकीमध्ये २३२ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. या निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुकीत जरांगे प्रभाव अयशस्वी ठरला, अशी टीका करणारांना मराठ्यांचा प्रभाव कळण्यासाठी संपूर्ण हयात जाईल. आपण मराठ्यांच्या मतांवर विजयी झालो नाही, असे निवडून आलेल्या एखाद्या आमदारास बोलून दाखवण्यास सांगा. आम्ही उमेदवाराच उभे केले नव्हते. तरीही आमचा प्रभाव अयशस्वी झाला असे का म्हणता? मराठा मतांशिवाय कुणीही सत्तेवर येऊ शकत नाही. मराठा प्रभाव अयशस्वी झाल्याचे विश्लेषण काय करता? महिनाभर थांबा, तुम्हाला आमची ताकद कळेल. मराठा समाज सर्व पक्षांत विखुरलेला असला तरी तो आरक्षणाच्या आंदोलनात एकत्र दिसेल. निवडून येणारे आणि पराभूत होणारे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला गेले पाहिजे.
हेही वाचा – महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय? कुणाला मिळणार सर्वाधिक वाटा
मराठा आरक्षणासाठी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आंतरवाली सराटीत सामूहिक आमरण उपोषण करणार. सरकार कुणाचेही येवो, आम्हाला आंदोलन करावे लागेल हे आपण आधीच सांगितले होते, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.





