जैन साधू, साध्वीजींचा वडगाव मावळात मंगल प्रवेश
युवाचार्य पूज्य महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात मुमुक्षु शिवम बाफना यांचा जैन भगवती दिक्षा महोत्सव होणार

वडगाव मावळ : येथील रहिवासी शिवम संदीप बाफना यांच्या शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या जैन भगवती दीक्षा महोत्सवासाठी युवाचार्य परमपूज्य श्री महेंद्र ऋषीजी महाराज यांच्यासह अनेक जैन साधू व साध्वीजींचा मंगल प्रवेश मंगळवारी वडगावमध्ये झाला.वर्धमान स्थानकवासी जैनसंघासह शहरातील विवीध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषी महाराज यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त १४ तारखेला शिवम बाफना यांचा जैन भगवती दीक्षा महोत्सव होणार आहे. युवाचार्य पूज्य महेंद्र ऋषीजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात मुमुक्षु शिवम बाफना यांचा जैन भगवती दिक्षा महोत्सव होणार आहे. येथील जैन श्री संघाने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
या सोहळ्यासाठी महेंद्र ऋषीजी महाराज यांच्यासह अनेक जैन साधू व साध्वीजींचे मंगळवारी वडगावमध्ये आगमन झाले. त्यांचे शहरात भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. दिक्षार्थी शिवम यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या आगमन यात्रेत जैन बांधव पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
हेही वाचा : पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा-कात्रज भुयारी मार्ग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवकार मंत्र पठण, मंगल कलश आणि आगम सह महिला भगिनी, पालखी, भारुड असे अनेक धार्मिक कार्यक्रम या स्वागत यात्रेदरम्यान सादर करण्यात आले. पवित्र मंगलपाठ नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. हा दीक्षा महोत्सव १४ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे शिवमच्या रूपाने या घरामध्ये ही तिसरी दीक्षा आहे. जैन स्थानकवासी श्रावक संघ, युथ ग्रुप, महिला मंडळ, पाठशाळा ग्रुप आदींनी संयोजन केले आहे.
वडगांव येथील रहिवाशी शिवम बाफना यांच्या दीक्षा महोत्सवासाठी युवाचार्य परमपूज्य महेंद्र ऋषीजी यांच्यासह अनेक जैन साधू आणि साध्वींचे मंगळवारी येथे आगमन झाले.