पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्ता परिवर्तन! सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Suvendu Adhikari | पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची विशेष उपस्थिती होती. सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राजकीय प्रथेनुसार, ममता बॅनर्जी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
हेही वाचा
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! अवघ्या ८ दिवसांत कमावले ६० कोटी
ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या सोहळ्याला देशभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा समावेश होता.
मंत्रिमंडळात पाच नव्या मंत्र्यांचा समावेश
सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतच पाच प्रमुख आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ज्येष्ठ नेते दिलीप घोष आणि आसनसोल दक्षिणच्या आमदार अग्निमित्रा पॉल यांचा समावेश आहे. फॅशन डिझायनर ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या अग्निमित्रा पॉल यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्यासह अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि मथाभंगा मतदारसंघाचे आमदार निसिथ प्रमाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.





