Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे महिनाभर बंद

पुणे | अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांसाठी मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिर १० मे ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. पुरातत्त्व विभागाने या संदर्भात माहिती दिली असून, कामाचा दर्जा आणि वेग राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने अष्टविनायक मंदिरांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडपाचे पौराणिक स्वरूप जपत दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. सध्या या तिन्ही ठिकाणी कामे प्रगतीपथावर असून, भाविकांच्या गर्दीमुळे कामात अडथळा येऊ नये म्हणून महिनाभर मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश सह धर्मादाय आयुक्तांनी ७ मे रोजी दिले आहेत.

हेही वाचा

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्ता परिवर्तन! सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

धार्मिक विधी सुरू राहणार, दर्शन मात्र बंद

मंदिरे भाविकांसाठी बंद असली तरी, या कालावधीत मंदिरांमधील नित्य पूजाअर्चा आणि इतर धार्मिक विधी नियमितपणे पार पडतील. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा मिळणार नाही. केवळ पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत कर्मचारी आणि विश्वस्त यांनाच प्रवेश दिला जाईल.

प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली असून ८ मे रोजी स्थानिक ग्रामस्थांसोबत यावर चर्चा करण्यात येणार आहे. ही विकासकामे मंदिरांच्या सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या भविष्यातील सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे भाविकांनी आणि नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button