मनोज जरांगे पाटीलांचा भाजपला थेट इशारा
एका घरात एकच तिकीट या धोरणामुळे भाजपने तिकीट नाकारल्याची माहिती,खेळ बिघडवणार
मराठवाडा : विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय एन्काऊंटर करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला दिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा फटका महायुतीला चांगलाच बसला तर आता विधासभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ जागा असून मनोज जरांगे पाटील हे खेळ बिघडवू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणूक लढायची का? याचा निर्णय २० तारखेला मनोज जरांगे पाटील घेणार आहेत. त्याआधीच जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू केल्यात.
यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी मुलाखती घेतल्या असून संभाव्य यादी देखील त्यांनी तयार केली आहे. मात्र इच्छुकांच्या भेटीगाठीसह रात्री झालेल्या दोन भेटी खास महत्त्वाच्या आहेत. भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री पावणे दोन वाजता भेट घेतली. गेल्या आठ दिवसांत विखे पाटील जरांगेंच्या दोन वेळा भेटीला आलेत. तर विखे गेल्यानंतर रात्री पावणे तीन वाजता शरद पवार गटाचे राजेश टोपे यांनी भेट घेतली आहे.