‘शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले’; उदयनराजेंची टीका

सातारा | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला राज्यात कुणाचं सरकार येणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार यावर मोठं विधान केलं आहे.
उदयनराजे काय म्हणाले?
जी कामे भाजप महायुतीच्या कालावधीत झाली, ती शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय कालावधीत का होऊ शकली नाहीत, याचा विचार जनतेने करायला हवा. पवारांनी आजवर केवळ राजकारण केले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवत स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम पवारांनी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना केला. अनेक वर्षे केंद्र आणि राज्यातील सत्ता असताना, चार वेळा मुख्यमंत्री असतानाही पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. अन्य छोटी छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली. याला सर्वस्वी पवार जबाबदार असल्याची टीकाही उदयनराजे यांनी यावेळी केली.
हेही वाचा – पुढील ३ दिवस धोक्याचे! हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
शरद पवार यांनी राज्यात कृष्णा खोरे, दुष्काळी जलसिंचन, औद्योगिकीकरण, पाणी प्रश्न, रस्तेविकासापासून महाराष्ट्राला वंचित ठेवले. ते चार वेळा मुख्यमंत्री होते. त्या वेळी केंद्र आणि राज्यामध्ये एकच सत्ता होती. मात्र, त्यांनी राज्यासाठी कोणतेही मोठे विकासाचे काम केले नाही, असे सांगत उदयनराजे भोसले म्हणाले, की त्यांनी केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम केले. राज्यात दुजाभाव निर्माण करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांनी पायदळी तुडवला. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सतत समाजाला फसविण्याचे काम पवार आजवर करत आले आहेत. सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून स्वतःला आणि स्वतःची हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे केले, असा आरोपही उदयनराजे यांनी केला.
दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने सर्व समाजाला एकसंध आणि सर्व समाजाचे कल्याण करण्याचे काम केले.
युवकांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. शरद पवारांनी फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलेे. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आज देशातील अन्य छोट्या राज्यातून आलेले नेत्यांनी त्यांची राज्ये विकसित केली, ते नेते वरिष्ठ पदावर गेले. पण हे पवार करू शकले नाहीत. आपल्याकडून हे का घडू शकले नाही, याचा विचार त्यांनी करावा. त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये. निवडणूक येतील जातील पण समाजात हे विष कालवण्याचे काम केले त्याबद्दल त्यांना भविष्य माफ करणार नाही असा घणाघाती आरोप उदयनराजेंनी यावेळी केला.





