आमदार सोडून जाणे म्हणजे पक्ष खिळखिळा होत नाही : खासदार संजय राऊत
अजित पवार यांच्याबाबतच्या वृत्तांनंतर मोठे विधान : राज्यातील राजकारणात मोठी खळबळ होणार?
मुंबई । विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपाला वाटत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. २०२४ पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. २०-२५ आमदार सोडून जाणे म्हणजे पक्ष खिळखिळा होत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. आणि अशातच आता ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रातील बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात सध्या कमालीचा संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
मविआतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. २०२४पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असतील. २०-२५ आमदार सोडून जाणे म्हणजे पक्ष खिळखिळा होत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही : राऊत
राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. बातम्या येतात ४० फुटले, ५० फुटले. अशा बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत, त्या खोट्या आहेत. भाजप या अफवा, वावड्या उठवल्या जात आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. पण तसे काहीही होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ : राऊत
सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या पोटात सगळ्यात जास्त गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य पुन्हा एकदा मविआमधूनच शिखरावर जाणार आहे. त्यांच्याविषयीच्या बातम्यांचा मविआच्या एकीवर काहीही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललो आहोत. तुम्ही जे आकडे सांगत आहेत. ते कुठून येतात हे मला माहिती नाही. एकाच वृत्तपत्राकडे हे आकडे कुठून येतात माहिती नाही, असेही संजय राऊत म्हणाले.





