Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कोकाटे यांचा राजीनामा, वर्षभरात राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्याला डच्चू

मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ तसेच नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर गुरुवारी त्यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभय देण्यात येत असल्याची सरकारवर टीका होऊ लागल्याने कोकाटे यांना राजीनाम्याशिवाय पर्याय राहिला नाही. महायुती सरकारच्या एक वर्षाच्या काळात धनंजय मुंडे यांच्यानंतर राजीनामा द्यावा लागलेले माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आहेत.

शिक्षेनंतर कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयाने वाॅरंट जारी केले आहे. या साऱ्या घडामोडी लक्षात घेता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संबंधित मंत्र्याला पाठीशी घातल्यास महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकाटे यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्यास तयार नव्हते. बुधवारी रात्री कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती काढून घेण्यात आली व त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवण्यात आले.

कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत कोकाटे यांना मंत्रीपदी कायम ठेवावे, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार व सुनील तटकरे यांच्यात बुधवारी मध्यरात्री पुन्हा चर्चा झाली. कोकाटे यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम ठेवल्यास त्यातून चुकीचा संदेश जाईल व विरोधकांना टीकेची संधी मिळेल, अशी भाजपने भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांनी अभय देण्यास नकार दिल्यानंतर अजित पवार यांचा नाइलाज झाला. कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे पत्र अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केले.

हेही वाचा –  डी वाय पाटील विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे थिंकटेक इंडियामध्ये यश

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला दोन आठवड्यांपूर्वी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाइलवर रमी खेळत असल्याची चित्रफीत समोर आल्यावर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते व त्यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक अशी खाती सोपविण्यात आली होती. शिवसेनेचे संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय राठोड, योगेश कदम या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. शिरसाट यांच्या मुलाच्या व्यवहाराच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. आरोपांनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लेडीज बारमधील वाद्यवृदांचा परवाना परत केला होता.

सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम केल्याने मंत्रीपदाचा राजीनामा दिलेल्या माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचणार का, हा पुढील प्रश्न आहे. १९५१च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ८ (३) अन्वये दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा ठोठावल्यास लगेचच आमदारकी रद्द होते. कायद्यातील या तरतुदीनुसार कोकाटे यांची आमदारकी तशी रद्द झाली आहे. फक्त विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची कारवाई केल्यावर विधानसभेची ती जागा रिक्त झाल्याचे जाहीर करण्यात येते. राहुल गांधी किंवा सुनील केदार यांना शिक्षा ठोठावल्यावर लोकसभा व राज्य विधानसभा सचिवालयाने तात्काळ खासदारकी व आमदारकी रद्द केली होती. दोषसिद्धीस स्थगिती न मिळाल्यास कोकाटे यांना लगेचच विधानसभा सचिवालय अपात्र ठरविणार का, ही चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसी समाजातील छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात परतण्यास मुंडे हे प्रयत्नशील आहेत. पण अजित पवार हे कोकाटे यांच्या जागी मराठा समाजातील नेत्याला संधी देतात की मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button