‘धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा क्रूर, माझ्या आयुष्यातील २७ वर्षे नरकासारखी’; करुणा शर्मा

Karuna Sharma | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पोटगी प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल कायम ठेवला आहे. करुणा शर्मा यांना दरमहिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने योग्य ठरवला असून, दोन मुलांना जन्म देणं हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असंही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं आहे. या निकालानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधत धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. “धनंजय मुंडे हे औरंगजेबापेक्षाही क्रूर आहेत,” असं सणसणीत मत त्यांनी व्यक्त केलं.
करुणा शर्मा यांनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत करताना सांगितलं, न्यायालयाने जो निकाल दिला त्याबद्दल मी न्यायाधीशांचे आभार मानते. खूप चांगली गोष्ट त्यांनी निकालात नमूद केली. आमदार किंवा मंत्र्याच्या पत्नीला तसंच राहणीमान असला पाहिजे. धनंजय मुंडे मला भेटला तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो. त्याने संघर्ष केला तेव्हा मी माझी मालमत्ता विकली. दोनदा मंगळसूत्रही गहाण ठेवलं होतं. मी ते पैसे त्यांना (धनंजय मुंडे) दिले होते. मंत्री झाल्यानंतर ऐश करण्यासाठी तुम्ही बाजारु महिलांना ठेवत आहात. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी त्याबाबत गप्प बसणार नाही. माझ्याशी जे वागलं गेलं ते क्रूर पद्धतीने ते वागले आहेत. न्यायाधीशांना सगळ्या गोष्टी माहीत नाहीत कारण मी सगळे पुरावे उघड केलेले नाहीत. माझ्या बहिणीचे व्हिडीओ, आईची आत्महत्या, मी विष प्यायलं होतं. या सगळ्या गोष्टी समोर आणणार आहे.
हेही वाचा : “चंद्रावर डाग सापडतील, पण मोदी निष्कलंक”; कंगना रणौतचं वक्तव्य
मी ४५ दिवस तुरुंगात होते. इतका नीचपणा कुणीही संपूर्ण भारतात कधी केला नसेल. औरंगजेबही यांच्यापुढे (धनंजय मुंडे) फिका पडेल इतक्या नीच वृत्तीचे हे लोक आहेत. औरंगजेबाने त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकलं नसेल. अत्यंत नीच प्रवृत्तीचे लोक आणि माझ्यासह जे २७ वर्षे त्यांनी घालवली तीदेखील क्रूर म्हणावी अशीच होती. दोन मुलांकडे बघून मी सहन करत होते. येत्या काळात मी सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहेत. यामध्ये फक्त धनंजय मुंडे नाहीत इतरही लोक आहेत की सगळ्यांना शिक्षा होणार आहे, असं करूणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडेंच्या खोटारडेपणाला काही सीमा नाही, माझ्या नावावर २००३ मध्ये आम्ही घर खरेदी केलं होतं ते घर करुणा धनंजय मुंडे या नावावर होतं. मात्र आता धनंजय मुंडे हे वकिलामार्फत जे कोर्टाला सांगत आहेत ते खोटं आहे. २००३ मध्ये धनंजय मुंडे कुठे आमदार होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.