“चंद्रावर डाग सापडतील, पण मोदी निष्कलंक”; कंगना रणौतचं वक्तव्य

Kangana Ranaut | अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या खासदार असलेल्या कंगना यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले, “चंद्रावरही डाग सापडतील, पण नरेंद्र मोदी निष्कलंक आहेत.” तसेच काँग्रेसवर हल्ला चढवताना त्या म्हणाल्या की, काँग्रेसची कोणतीही विचारधारा नाही, फक्त ‘चोर चोर मौसेरे भाई’ हा त्यांचा मूलमंत्र आहे.
कंगना रणौत म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मंडीच्या मुलीला इतकी बदनामी करा की कुणी निवडणूक लढवायलाच नको, असा त्यांचा डाव होता. पण मी निवडून आले आणि आज भाषणाला उभी आहे. यावरून हे सिद्ध होतं की मुलींना अपशब्द बोलून, त्यांच्या महत्त्वाकांक्षांची खिल्ली उडवून किंवा लाज वाटेल असं बोलण्याचे दिवस संपले आहेत. आज मंडी हा मतदारसंघ विकासासाठी ओळखला जातो. मी मंडीच्या जनतेला नमस्कार करते.”
हेही वाचा : Gold Price | सोन्या-चांदीच्या दरात बदल; जाणून घ्या १० ग्रॅमचा भाव
कंगनाने काँग्रेसवर घोटाळ्यांचा डोंगर उभा केल्याचा आरोप केला. “२०१४ च्या आधी हा घोटाळा, तो घोटाळा, चारा घोटाळा, टू जी स्कॅम असे अनंत घोटाळे होते. राजकारणी म्हणजे चोर अशीच समजूत झाली होती. माझ्यासारख्यांना तर वाटत होतं की देश सोडून जावं. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघा, ते निष्कलंक आहेत,” असे त्या म्हणाल्या. भाजपा आणि संघाची विचारधारा सनातन धर्म आणि ‘वसुधैव कुटुंबकम’वर आधारित असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “काँग्रेसची विचारधारा काय? त्यांच्याकडे काहीच नाही.”
कंगना यांनी भाजपाच्या संघर्षाचा उल्लेख करताना म्हटले, “१९८० मध्ये भाजपाची स्थापना झाली. काँग्रेसच्या घाणेरड्या नीतीमुळे आम्हाला संघर्ष करावा लागला. या लोकांमध्ये गुन्हेगारच जास्त आहेत. एका मताने त्यांनी अटलजींचं सरकार पाडलं होतं.” मागच्या आठवड्यात मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “या देशात कोणतीही संस्था, धर्म किंवा व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. पण काँग्रेसला हे समजलं नाही. संसदेत मी स्वतः पाहिलं की अमित शाह समजावून सांगत होते, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येत नाही.”