मोशी कचरा डेपो दुर्घटना अपडेट : पर्यावरण विभागाचे प्रमुख अभियंता संजय कुलकर्णी यांचा पदभार काढला!
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश : मुख्य अभियंता-२ प्रमोद ओंबासे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी (१३ जुलै) आदेश काढत पर्यावरण अभियांत्रिकी विभागासह अनेक विभागांचा अतिरिक्त कार्यभार मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी यांच्याकडून काढून तो मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओंबासे यांच्याकडे सोपविला आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात बदलण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे.
हेही वाचा
भारताच्या प्रगतीसाठी संशोधनावर लक्ष; पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील
काय बदल झाले?
आयुक्तांच्या आदेशानुसार, मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओंबासे यांच्याकडे पर्यावरण अभियांत्रिकी, जलनिःसारण मुख्य कार्यालय, झोनिपू, स्थापत्य, BSUP आणि PMAY या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता (पर्यावरण) सोहन मधुकर निकम यांच्याकडे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचे कामकाज देण्यात आले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांसह हा अतिरिक्त कार्यभार सांभाळायचा आहे.
मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मोशी कचरा डेपोवरील भीषण दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशात हा बदल “प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने” करण्यात आल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. आदेशात मोशी दुर्घटनेचा थेट उल्लेख किंवा या बदलाचा दुर्घटनेशी संबंध असल्याचे नमूद केलेले नाही. मोशी दुर्घटनेनंतर पर्यावरण विभागाच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू असतानाच विभागाच्या अतिरिक्त पदभारात बदल करण्यात आल्याने या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.





