मतदान केंद्रावर पहिल्या टप्यात मतदानासाठी गर्दी
मतदार यादीत नावे नसल्याने गोंधळ
पुणे : मतदानावर पावसाचे सावट असल्याने वडगाव शेरी, खराडी, येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी परिसरात मतदान केंद्रावर पहिल्या टप्यात मतदानासाठी गर्दी झाली. सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. वडगाव शेरीतील सारथी विद्यालयात मतदानासाठी आलेल्या मतदारांची नावे नसल्याने गोंधळ उडाला. टिंगरेनगर भागातील मतदान केंद्रातील ईव्हीएम यंत्र काही काळ बंद पडले होते.
सकाळी नऊपर्यंत मतदान कमी झाले होते. मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसून आले. वडगाव शेरी मतदार संघातील येरवडा, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, चंदननगर, खराडी, वडगाव शेरी भागातील मतदान केंद्रावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. गेले दोन दिवस शहरात अवकाळी पाऊस होत आहे. सायंकाळनंतर मुसळधार पाऊस होत असल्याने मतदानाच्या पहिल्या टप्यात वडगाव शेरीतील विविध मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, लक्ष्मीनगर येथील उर्दू हायस्कूल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरातील मोझे विद्यालय, भिकू पठारे विद्यालय, वडगाव शेरीतील सुंदराबाई मराठे शाळा, विश्रांतवाडीतील विठ्ठलराव गाडगीळ विद्यालय, लोहगाव येथील खेसे विद्यालयातील मतदान केंद्रात मतदारांची गर्दी झाली होती.
वडगाव शेरीतील सारथी विद्यालयात मतदानासाठी आलेल्या मतदारयादीत मतदारांची नावे नसल्याने गोंधळ उडाला. मतदार यादीत नवमतदारांची नावे नव्हती. यादीत मृत मतदारांची नावे असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. वडगाव शेरी मतदारसंघात विमाननगर, खराडी, कल्याणीनगर परिसरातील उच्चभ्रु सोसायट्या आहेत. या भागातील मतदान केंद्रात दुपारनंतर गर्दी झाली होती.





