ISIच्या निमंत्रणावरून गोगोईंचा पाक दौरा; हिमंता बिस्व सरमांचा आरोप

Himanta Biswa Sarma | आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. हिमंता बिस्व सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानी सरकारचं गृह मंत्रालय व आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तान दौरा केल्याचा आणि तिथे काही संशयास्पद कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप केला आहे. मात्र खासदार गोगोई यांनी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांचे आरोप फेटाळले आहेत.
हिमंता बिस्व सरमा म्हणाले, की मी पूर्ण जबाबदारीने सांगतो की आसामचे खासदार गौरव गोगोई पाकिस्तानी गृहमंत्रालयाच्या निमंत्रणावर तिकडे गेले, ते तिथे काही दिवस राहिले. त्यांचा हा पाकिस्तान दौरा व त्यांच्या कारवायांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. आमच्याकडे याबाबतचे दस्तावेजी पुरावे देखील आहेत. १० सप्टेंबरपर्यंत आम्ही जनतेसमोर पुरावे सादर करू.
हेही वाचा : अग्नितांडव.! हैदराबादमधील चारमिनारजवळच्या आगीत १७ ठार
गौरव गोगोई पर्यटनासाठी नव्हे तर प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला गेले होते. ही देशासाठी खूप गंभीर बाब आहे. पाकिस्तानी गृहमंत्रालयाकडून त्यांना थेट निमंत्रण मिळणं हा पुरावा आहे की ते पाकिस्तानशी संबंधित आहेत, असंही आसामचे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
सरमा यांच्या आरोपांवर खासदार गोगोई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मानसिक आरोग्याची चिंता आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते अशाच पद्धतीने माझ्यावर टीका करत आहे. त्यांनी नेहमीच माझ्यावर खोटेनाटे आरोप केले आहेत. त्यांचे आरोप कधी सिद्ध नाही झाले. २०२६ नंतर आम्ही त्यांच्या भल्यासाठी काम करू. माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बसण्यापेक्षा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आसामच्या बिकट आर्थिक परिस्थितीवर आणि कोळसा माफियांकडे लक्ष द्यावं. हिमंता बिस्व सरमा जे काही बोलत आहेत, त्यापैकी ९९ टक्के माहिती चुकीची व फसवी आहे. त्यांनी जगासमोर तथ्य मांडलं पाहिजे. मी ठामपणे सांगतो की सप्टेंबरमध्ये ते कुठल्याही प्रकारची माहिती सादर करू शकणार नाहीत.