Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी 5 हजार 400 कोटीचा निधी देणार’; कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

सोलापूर : राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून त्यांच्या आवडीचे तसेच कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी पुढील पाच वर्षात एकूण 5 हजा 400 कोटीचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

या कार्यक्रमास आमदार नारायण पाटील, माजी आमदार राम सातपुते, नगराध्यक्ष मोहिनी सावंत, जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, प्रमुख पाहुणे सुनील आंबेकर, औद्योगिक प्रशिक्षण संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ठेगडे, कौशल्य रोजगार उद्योजकता सह आयुक्त संगीता खंदारे, प्रा. मनोज बिडकर यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले की, राज्य शासनाने पुढील पाच वर्षात 5 हजार 400 कोटीचा निधी उपलब्ध करून सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच येत्या 6 महिन्यांच्या कालावधीत टाटा उद्योग समूहाच्या आर्थिक सहकार्यातून प्रत्येक जिल्ह्यात दोन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था  सुरू करण्याचा तसेच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक संस्थेत शॉर्ट टर्म कोर्सही सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पालकांच्या आत्मविश्वासाची जोडही आवश्यक’; मंत्री डॉ. अशोक वुईके

शहराबरोबरच गावातील युवकांना कुशल बनवण्यात येईल, असा भर देत गाव आणि देश आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या उद्योगनिष्ठ विचारांना चालना देताना तंत्रज्ञान व कौशल्य यांचा समन्वय साधला जाईल, असे श्री. लोढा यांनी सांगून मदनदास देवी यांच्या कार्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कौशल्य शिक्षण आणि उद्योजकतेकडे वळण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून विद्यार्थी शिकून संघटित होऊन कुशल उद्योजक बनावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, यासाठी त्याला उद्योजकता शिक्षण मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मदनदास देवी यांच्या कार्याच्या प्रेरणेतून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शासनाच्या वतीने “मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नामांतर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मदनदास देवी यांचा जन्म करमाळ्यात झाला असून विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठी केलेल्या त्यांच्या कार्यामुळे करमाळा वाशीयांसाठी अभिमान आणि प्रेरणेची बाब आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती व शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे, असे आवाहन श्री. लोढा यांनी केले. तसेच यावेळी येथील स्थानिक युवकांनी केलेल्या मागणीला अनुसरून त्यांनी नवीन पाच अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदनदास देवी यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याविषयी गौरवउद्गार काढले. तर या प्रशिक्षण संस्थेचे नामांतर मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे प्रेरणादायी विचार सदैव राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांनी चित्रफितीच्या माध्यमातून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा नामांतर समारंभ पार पडला. या प्रसंगी कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून व्यासपीठावर स्वर्गीय मदनदास देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज बिडकर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार आयएमसीचे चेअरमन खुशालचंद राठी यांनी व्यक्त केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button