कंठ दाटला, डोळे पाणावले!
सुनेत्रा पवारांनी शिवनेरीवर शब्द देताना फडणवीस-शिंदेही झाले भावूक

पुणे | महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा पारंपारिक थाटात पार पडला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता. या ऐतिहासिक क्षणी भाषण करताना सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
“आज दादांची उणीव भासत आहे,” असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला. अजितदादांच्या पश्चात ही जबाबदारी निभावताना त्यांनी शिवनेरीच्या साक्षीने रयतेच्या सेवेचा संकल्प सोडला. त्यांच्या या भावूक भाषणामुळे शिवनेरीवर उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील हेलावून गेले होते.
“ज्या ठिकाणी दादा (अजित पवार) उभे राहायचे, आज तिथे उभे राहून बोलताना मनावर प्रचंड दडपण आणि मनात दाटून आलेल्या आठवणी आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाच्या कठीण प्रसंगाचा खुलासा करताना त्या म्हणाल्या की, त्या वेळी माझ्या डोळ्यासमोर केवळ राजमाता जिजाऊंचे चित्र होते, ज्यांनी संकटातही डगमगून न जाण्याची प्रेरणा दिली.
हेही वाचा : सुपर-८ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २२ फेब्रुवारीला; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबादमध्ये रंगणार लढत
रयतेला दिला पहिला शब्द:
शिवनेरीच्या पवित्र भूमीची साक्ष काढून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी रयतेला वचन दिले की, “शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही”. अजितदादांनी सुरू ठेवलेली विकासाची कामे, विशेषतः शिवनेरी विकास आराखडा आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन, आपण त्याच गतीने पुढे नेऊ, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
फडणवीस आणि शिंदेंकडून सांत्वन:
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे पाहून दोन्ही नेत्यांनी त्यांचे सांत्वन केले आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.





