निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत आज मोठी घोषणा करण्याची शक्यता; देशभरात SIR लागू करणार?

Election Commission : निवडणूक आयोगाची आज सायंकाळी 4.15 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR संपूर्ण देशभरात (SIR voter list) करण्याचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 राज्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह सिंधू आणि विवेक जोशी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील. आगामी काळात ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश असू शकतो. त्यानुसार पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीचाही या राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात असण्याची शक्यता आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत तीन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत बैठक घेतली होती. त्या बैठकीत बिहारमध्ये एसआयआर राबवताना आलेल्या अनुभवांवर विचार करण्यात आला आणि एसआयआर प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा विचार करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार बिहारमधील एसआयआर प्रक्रिया 24 जून ते 30 सप्टेंबर म्हणजे जवळपास चार महिने चालली. मात्र निवडणूक आयोग हा कालावधी कमी करण्याबाबत विचार करत आहे.
हा निर्णय बिहारमध्ये एसआयआर अंमलबजावणी करताना विरोधी पक्षांकडून व्यक्त करण्यात आलेल्या तीव्र नाराजीनंतर घेण्यात आला. बिहारमधील एसआयआर प्रक्रियेचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता.
हेही वाचा – नशामुक्त भारत ही काळाची गरज! – ॲड. सतिश गोरडे
बिहारमध्ये निवडणूक आयोगानं एसआयआर प्रक्रिया राबवल्यानंतर 7 कोटी 42 लाख मतदारांची यादी 30 सप्टेंबरला प्रकाशित केली होती. त्यानुसार आता नव्या मतदारांची नोंदणी, मृत मतदारांचे नाव हटविणे, दुबार नोंदणी रद्द करणे, यादीतील इतर चुका दुरूस्त करण्याचे महत्वपूर्ण या प्रक्रियेत केले जाणार आहे.
विरोधी पक्षाची मतचोरीवरून आक्रमक भूमिका
दुसरीकडे, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांनी कथित मतचोरीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १ नोव्हेंबरला विरोधकांकडून मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. तर मतदारयाद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले होते.
SIR म्हणजे काय?
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) म्हणजे मतदार याद्यांचे संपूर्ण नव्याने पुनरावलोकन म्हणजेच सर्व नोंदणीकृत मतदारांना त्यांच्या नोंदणीसाठी नवे फॉर्म भरावे लागतात. याच्या उलट स्पेशल समरी रिव्हिजन (SSR) ही एक वार्षिक प्रक्रिया असते किंवा निवडणुकांपूर्वी केली जाते. ज्यामध्ये फक्त नवीन नावे जोडणे, वगळणे किंवा दुरुस्त्या करणे इतकेच बदल केले जातात.
देशात सखोल पुनरावलोकन (SIR) गेल्या जवळपास दोन दशकांपासून झालेले नाही. बिहारमध्ये शेवटचा SIR वर्ष 2003 मध्ये करण्यात आला होता. नवी दिल्लीत शेवटची एसआयआर 2008 मध्ये झाली होती. उत्तराखंडमध्ये एसआयआर 2006 मध्ये झाली होती. इतर राज्यांमध्ये 2002 ते 2004 मध्ये एसआयआर पार पडली होती. पुन्हा एकदा देशव्यापी स्तरावर मतदार यादींचे संपूर्ण नव्याने परीक्षण होणार आहे.
दरम्यान, बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. तर, निकाल 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.




