देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौरा; इच्छुकांची भेट घेत नाराजी करणार दूर…

पुणे : देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे अनेक नेते नाराज आहेत, अशातच त्यांची मनधरणी करण्यासाठी फडणवीस इच्छुक नाराज उमेदवारांची भेट घेणार आहेत. याशिवाय फडणवीस पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. नुकतेच फडणवीस पुण्यात दाखल झाले आहेत.
कसबा मतदारसंघामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. याशिवाय पर्वतीमधून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कोथरूडमधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि शिवाजीनगरमध्ये माजी नगरसेवक सनी निम्हन इच्छुक होते. तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्या ठिकाणी माजी आमदार जगदीश मुळीक नाराज आहेत.
हेही वाचा – ‘विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’; ICU मधून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
दरम्यान, पक्षाने विद्यमान आमदारांवरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांचा हिरमुड झाला होता. त्यामुळे अनेक नेते नाराज असल्याचं दिसून आलं होतं. आता फडणवीस नाराज नेत्यांशी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या सर्व नाराजांची आज देवेंद्र फडणवीस व्यक्तिगत भेट घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. या सर्वांना प्रचारात सक्रिय होण्याचा फडणवीस सल्ला देणार असल्याचं सांगितलं जात आहे. अन्यथा याचा महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.





