परदेशातील मुलांनाही मिळणार मराठीचे ऑनलाईन शिक्षण; मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी : मराठी साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य अन्य भाषांमध्ये प्रकाशित व्हावं हा संकल्प स्व. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना केलेला होता. पण, त्याची अंमलबजावणी का झाली नाही हे मला माहीत नाही. अनुवाद अकादमी तयार करुन त्याची अंमलबजावणी या अकादमीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय विश्व मराठी साहित्य संमेलनात घेतोय.
ज्या लेखकाला त्याचं साहित्य मराठीतून हिंदीत करायचं असेल, मराठीतून कन्नड मध्ये करायचं असेल, मराठीतून तमीळमध्ये करायचं असेल तर त्याला देखील निधी द्यायचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतलेला आहे. तसेच परदेशातील मराठी मुलांना ऑनलाईन मराठी भाषेचे शिक्षण देण्याचा उपक्रम पुढच्या वर्षापासून सुरु केला जाणार असल्याचे आश्वासन उद्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मधुभाई साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा निमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व प्रकट मुलाखत कार्यक्रम येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी साहित्यिक विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.
हेही वाचा – भारताचं सुपर-८ फेरीचं वेळापत्रक ठरलं! वेस्ट इंडिजसह ‘या’ संघाविरूद्ध होणार सामने
मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या हस्ते पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सामंत पुढे म्हणाले, मराठी भाषा पुढे नेण्यासाठी जे जे काही करावे लागेल ते मंत्री या नात्याने करायला नक्की तयार आहे. मी मंत्री झाल्यापासून २७ फेब्रुवारी चा कार्यक्रम आता गेट वे ऑफ इंडिया ला करतो. ज्यावेळी आपण मोठ्या मंचावर करतो, त्यावेळी त्याची कुठेतरी चर्चा होते आणि त्याच्यातून अजून तरुण साहित्यिक निर्माण व्हावेत ही या कार्यक्रमा मागील भावना आहे.
मराठी भाषा विभागाला वीत्त मंत्री अजितदादांनी २६५ कोटी रुपये दिले. त्यामधून सगळे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहेत. बाल साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन असेल, युवा साहित्य संमेलन असेल, दिल्लीचे आमचे मराठी साहित्य संमेलन असेल, परवा झालेलं साताऱ्याचं मराठी साहित्य संमेलन असेल. आज मराठी भाषेचं दालन महाराष्ट्राच्या कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये उभारण्याची ताकद आज मराठी भाषा विभागाची झालेली आहे. काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं गाव करण्याचा निर्णय माझ्या मराठी भाषा विभागाने घेतलेल्या आहे.




