‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई करणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगल्या भावनेने तयार केलेली आहे. या योजनेचा गैरफायदा घेतलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यात काही पुरुषांनी गैरफायदा घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून लाभ घेतलेली सर्व रक्कम वसूल करण्यात येणार आहे. रक्कम परत करण्यास मदत न करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेले असताना अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले.लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचे पैसे दिले जात आहे. या योजनेत नोकरी करीत असलेल्यांची नावे वगळण्यात आली आहेत. नियमात न बसणारी नावे जसजशी पुढे येतील तसतशी ती वगळण्यात येतील. या योजनेत पुरुषांचे नाव येण्याचे कारण नाही. ही योजना पुरुषांची नाही, असेही अजित पवार यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा – “विजेच्या धक्क्याची अफवा, प्रमाणापेक्षा जास्त गर्दी… ; मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली आहे. इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयाकडून चौकशीचा अहवाल आलेला नाही. अहवाल सकारात्मक असल्यास व ते दोषी नसल्यास त्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत पवार यांनी मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याबाबतचे संकेतच जाहीर केले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी किंवा मुंबईत आधी चर्चा करून त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहे.
त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले आहे.कुस्ती संघटनेतील वाद थांबले पाहिजे. कुठल्याही क्रीडा संघटनेत दोन संघटना असा वाद नको. स्पर्धा भरवल्यानंतर खेळाडूंना त्रास होतो. स्पर्धेचे आयोजन व्यवस्थित झाले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. संघटनांच्या वादाबाबत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन शहानिशा करणार आहे. अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेशी कोणती संघटना संलग्न आहे हे पाहण्यात येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले आहे.





