Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता; उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात…

अहिल्यानगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहिल्यानगर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. मात्र अद्यापि नगरची जागा भाजप की राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) हे अद्याप महायुतीकडून जाहीर झाले नसले तरी जागा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज १ जूनपर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २ जूनला छाननी व ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. १८ जूनला सकाळी ८ ते सायंकाळी ४ दरम्यान मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावे लागणार आहेत तर मतदान प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

नगरची जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे यांचे धोरण राज्य पातळीवरील १६ जागांच्या जागा वाटपानुसार ठरणार आहे. यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीने जागा लढवली होती. त्या आधारावर अजित पवार गटाने महायुतीमध्ये या जागेवर दावा सांगितला आहे. पक्षाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप प्रयत्नशील आहेत. अजित पवार असताना घुले यांना शब्द मिळाल्याचा दावा केला जात आहे तर सचिन जगताप हे या जागेवर निवडून आलेले दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव आहेत. अरुण जगताप यापूर्वी दोनदा मतदार संघातून निवडून गेलेले आहेत. अर्थात त्यावेळी राष्ट्रवादीचे मतदार संख्याबळ अधिक होते.

हेही वाचा –  घर, जमीन किंवा दुकान खरेदी करताय? ‘या’ ५ कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी नक्की करा

परंतु आता परिस्थिती बदलली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून भाजपचे संख्याबळ वाढलेले आहे. त्या आधारावर भाजपने नगरच्या जागेसाठी दावा केला आहे. राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातून भाजपला अनुकूल भूमिका घेत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय सहजसाध्य झाला. त्याचवेळी तनपुरे यांना विधान परिषदेच्या जागेसाठी शब्द मिळाल्याची चर्चा होत आहे.

या पार्श्वभूमीवर तनपुरे भाजप प्रवेश करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तनपुरे गेली काही दिवस परदेश दौऱ्यावर होते, ते आता परतले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात भाजपकडे सक्षम उमेदवार नसला तरी भाजपच्या संख्याबळात मोठी वाढ झालेली आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीचा यापूर्वीचा इतिहास मतांच्या फटाफुटीचा आहे. त्यामुळे भाजपला पर्यायी उमेदवार देताना विचार करावा लागणार आहे. जिल्ह्यात नातेगोत्यांचे राजकारणही जोरात चालते. त्या आधारावर चंद्रशेखर घुले यांच्या राष्ट्रवादीकडील दावेदारीकडे पाहिले जाते.

महायुतीची जागा वाटप व उमेदवारी अद्याप निश्चित नसली तरीविरोधी महाविकास आघाडीची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही मात्र ‘मविआ’कडील मतदारांचे संख्याबळ अत्यंत कमी आहे. यापूर्वी नगरची जागा एकत्रित शिवसेनेने लढवली होती. आघाडीला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button